Mahabreaking

[breaking_news]

Mission Parivartan :मिशन परिवर्तनचा गांजाविक्रेत्यांना दणका! खामगावात दोघे जेरबंद; ५.९४७ किलो गांजा जप्त

Mission Parivartan : बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. खामगाव शहरातील बसस्थानक परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तब्बल ५ किलो ९४७ ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

ganja

 खामगाव बसस्थानक परिसरात गांजाचा साठा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

गजानन तिडके

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. खामगाव शहरातील बसस्थानक परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तब्बल ५ किलो ९४७ ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

add

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात ‘मिशन परिवर्तन’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गांजा व तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करून कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक परिसरात काही व्यक्ती चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा या अंमली पदार्थाचा साठा बाळगून आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकून तपासणी केली.

या कारवाईत सचिन प्रभाकर थिगळे (वय ३५, रा. कटोडा, ता. चिखली) आणि शेख सलीम शेख रजाक (वय ३५, रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली, जि. बुलढाणा) हे दोघे गांजा बाळगताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ५ किलो ९४७ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत २ लाख ९७ हजार ३५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय २० हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ३ लाख १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३४/२०२६ नुसार अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८ (क) आणि २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) आणि अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाळे, सतीश नाटेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा मोरे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान टेकाळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

‘मिशन परिवर्तन’च्या माध्यमातून जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, खामगावमधील या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या विरोधातील पोलिसांच्या मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top