Outdoor sports : व्यक्तीच्या आयुष्यात खेळांचे असाधारण महत्त्व असून, मैदानी खेळांमुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते. खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात खेळांना महत्त्वाचे स्थान द्यावे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी केले.

सहा जिल्ह्यांचे पोलीस खेळाडू आमनेसामने; बुलढाण्यात २८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार क्रीडा स्पर्धांचा थरार
गजानन तिडके
बुलढाणा : व्यक्तीच्या आयुष्यात खेळांचे असाधारण महत्त्व असून, मैदानी खेळांमुळे शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत होते. खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात खेळांना महत्त्वाचे स्थान द्यावे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी केले.

बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ३७ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चे उद्घाटन डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पोलीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. नियमित व्यायाम आणि मैदानी खेळांमुळे शारीरिक क्षमता वाढण्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते. खेळाडूंनी स्पर्धेत विजय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्तीने सहभागी व्हावे आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
सहा पोलीस घटकांतील १,०९४ खेळाडूंचा सहभाग
अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २३ ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती ग्रामीण आणि पोलीस आयुक्तालय अमरावती शहर या सहा पोलीस घटकांतील एकूण १ हजार ९४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेत पुरुष व महिला गटांसह विविध प्रकारांतील एकूण १७ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, ज्युदो, तायक्वांदो, वुशू, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, १० किलोमीटर क्रॉस कंट्री आणि जलतरण या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत.
बुलढाण्यातील पाच ठिकाणी स्पर्धांचे आयोजन
परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध क्रीडा प्रकारांतील सामने पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, सहकार विद्या मंदिर आणि जिजामाता प्रेक्षागार, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले आहेत. जलतरण स्पर्धा खामगाव येथील जी.एस. महाविद्यालयात होणार आहेत.
या स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, विविध जिल्ह्यांतील खेळाडूंमध्ये क्रीडाभावना, परस्पर समन्वय आणि संघभावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले.
यावेळी खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, विविध शाखांचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहा पोलीस घटकांतील १,०९४ खेळाडूंच्या सहभागामुळे बुलढाणा जिल्ह्यात क्रीडा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, २८ नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धांकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

