Major Kishor Gawai : पातूर शहराचे वीर सुपुत्र शहीद मेजर किशोर साहेबराव गवई यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पातूर शहरासह परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते.

१६ वर्षे देशसेवा करणाऱ्या पातूरच्या वीर सुपुत्राला शासकीय इतमामात अखेरची मानवंदना; हजारो नागरिकांचे डोळे पाणावले
राहुल सोनोने
दिग्रस बू. : पातूर शहराचे वीर सुपुत्र शहीद मेजर किशोर साहेबराव गवई यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पातूर शहरासह परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते.
शहीद मेजर किशोर गवई हे भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटमध्ये मागील १६ वर्षांपासून देशसेवा करीत होते. सध्या त्यांची नियुक्ती अरुणाचल प्रदेशातील लेखापाणी येथे होती. उपचारासाठी त्यांना मध्य प्रदेशातील सागर येथील सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
शहीद जवानाची अंत्ययात्रा निघाल्यानंतर विविध ठिकाणी नागरिक, सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. टीकेव्ही चौक येथे तुळसाबाई कावल विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूलच्या वतीने शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. तर संभाजी चौक येथे भारतीय जनता पक्ष, महात्मा फुले स्मारक समिती तसेच महात्मा फुले भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर पातूर येथील बौद्ध स्मशानभूमीत भारतीय बौद्ध महासभा आणि आदरणीय भन्ते यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी भारतीय लष्करी परंपरेनुसार शहीद मेजर किशोर गवई यांच्या पार्थिवाला सशस्त्र सलामी देण्यात आली. महाराष्ट्र पोलीस बटालियन आणि एनसीसी बटालियनच्या वतीनेही त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शोकाकुल वातावरणात शहीद मेजर किशोर गवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद जवानाच्या सन्मानार्थ पातूर शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवून वीर जवानाप्रती आदर व्यक्त केला.
या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. देशसेवेसाठी आयुष्याची १६ वर्षे समर्पित करणाऱ्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. संपूर्ण पातूर शहर शोकमग्न झाले होते.
अंत्ययात्रेचे संपूर्ण नियोजन मिलिंद नवयुवक मंडळ, पातूर यांच्या वतीने करण्यात आले होते. तर पातूर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवून अंत्ययात्रेचे नियोजन सुरळीत पार पाडले.
देशाच्या रक्षणासाठी समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या वीर सुपुत्राच्या स्मृतींना पातूरकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

