Mobile network : साखरखेर्डा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांसह विविध मोबाईल कंपन्यांची सेवा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्यामुळे फोनवरून संवाद साधणेही कठीण झाले असून, वारंवार तक्रारी करूनही कंपन्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.

रिचार्जचे पैसे भरूनही नेटवर्क गायब; जिओ-व्होडाफोनच्या विस्कळीत सेवेमुळे नागरिक त्रस्त
साखरखेर्डा : साखरखेर्डा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांसह विविध मोबाईल कंपन्यांची सेवा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्यामुळे फोनवरून संवाद साधणेही कठीण झाले असून, वारंवार तक्रारी करूनही कंपन्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे.
साखरखेर्डा, लव्हाळा, सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, गुंज, वरोडी, गोरेगाव, उमनगाव, पांगरी काटे, बाळसमुद्र, सायाळा, लिंगा, शेंदुर्जन, आंबेवाडी, झोटींगा, देऊळगाव कोळ आणि मलकापूर पांग्रा यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची समस्या जाणवत आहे. दिवसभरातून एखाद-दोन वेळा नेटवर्क उपलब्ध झाले तरी काही वेळातच ते पुन्हा गायब होत असल्याने ग्राहकांना मोबाईल सेवांचा वापर करता येत नाही.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल ही केवळ संपर्काची सुविधा राहिलेली नसून दैनंदिन व्यवहारांचे महत्त्वाचे साधन बनले आहे. मात्र, नेटवर्कअभावी किराणा व्यापारी, ज्वेलर्स, ऑनलाइन व्यवहार करणारे व्यावसायिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबत आहेत. ऑनलाइन पेमेंट, बँकिंग व्यवहार, ओटीपी, आवश्यक फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणारी कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः व्यापाऱ्यांना ग्राहकांचे ऑनलाइन पेमेंट स्वीकारताना तसेच आर्थिक व्यवहार पूर्ण करताना त्रास सहन करावा लागत आहे.
मोबाईल कंपन्यांकडून आकर्षक योजनांचे आमिष दाखवून ग्राहकांना सिमकार्ड दिले जाते. मात्र, रिचार्ज केल्यानंतरही सेवा सुरळीत मिळेल याची खात्री नसल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. सध्या अनेक ग्राहकांना महिन्याकाठी सुमारे ३०० ते ३५० रुपये रिचार्जसाठी खर्च करावे लागत असताना अपेक्षित नेटवर्क आणि इंटरनेट सेवा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नेटवर्कच्या सततच्या समस्येमुळे अनेक मोबाईलधारकांनी आपले जुने सिमकार्ड बदलून इतर कंपन्यांचे सिमकार्ड घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, परिसरातील विविध गावांमध्ये नेटवर्कची समस्या कायम असल्याने ग्राहकांसमोर पर्यायाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
मोबाईल कंपन्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन नेटवर्कमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात आणि साखरखेर्ड्यासह परिसरातील सर्व गावांमध्ये अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

