child marriage : दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होत असतानाच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एका गावातील या बालिकेचा ३१ वर्षीय व्यक्तीसोबत विवाह लावून देण्याची तयारी सुरू होती. मात्र, प्रशासन, सामाजिक संस्था आणि बालसंरक्षण यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्याने हा बालविवाह रोखण्यात आला.

३१ वर्षीय व्यक्तीसोबत होणार होता १६ वर्षीय मुलीचा विवाह; प्रशासनाच्या तत्परतेने बालविवाहाला ब्रेक!
राहुल सोनोने
दिग्रस बु : दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होत असतानाच अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एका गावातील या बालिकेचा ३१ वर्षीय व्यक्तीसोबत विवाह लावून देण्याची तयारी सुरू होती. मात्र, प्रशासन, सामाजिक संस्था आणि बालसंरक्षण यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्याने हा बालविवाह रोखण्यात आला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या कार्यवाहीत चाईल्डलाईनच्या समुपदेशक शरयू तळेगावकर, सुपरवायझर रोहित भाकरे तसेच जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्पांतर्गत इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी, अकोला येथील जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कारवाईदरम्यान संबंधित बालिकेचे आई-वडील, प्रस्तावित वर आणि वऱ्हाडी मंडळींना बालकल्याण समिती, अकोला यांच्यासमक्ष उपस्थित करण्यात आले. त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायदेशीर तरतुदींबाबत समजावून सांगण्यात आले. यापुढे बालविवाह करणार नसल्याबाबत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्राम बालसंरक्षण समिती यांच्या उपस्थितीत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
बालविवाह ही केवळ कायद्याचे उल्लंघन करणारी बाब नसून, त्यामुळे बालिकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम होतात. बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था आणि ग्रामस्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. बालविवाह रोखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले.

