Mahabreaking

[breaking_news]

Cultivating a garden :दुष्काळातही फुलविली समृद्धीची बाग! चार एकर फुलशेतीतून भानुदास आव्हाड यांचे १८ लाखांचे उत्पन्न

Cultivating a garden : निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक शेती संकटात सापडली असताना सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भानुदास आव्हाड यांनी फुलशेतीचा पर्याय स्वीकारत आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग शोधला आहे. अवघ्या चार एकर क्षेत्रावर झेंडू, गुलाब आणि ग्लॅडिओलस या फुलांची लागवड करून ते दरवर्षी सुमारे १८ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या या प्रयोगातून दुष्काळी परिस्थितीतही जिद्द, नियोजन आणि कष्टाच्या जोरावर शेती फायदेशीर ठरू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Cultivating

सोयाबीन-कापसाला पर्याय ठरली फुलशेती; आंबेवाडीच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग!

अशोक इंगळे

साखरखेर्डा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक शेती संकटात सापडली असताना सिंदखेडराजा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भानुदास आव्हाड यांनी फुलशेतीचा पर्याय स्वीकारत आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग शोधला आहे. अवघ्या चार एकर क्षेत्रावर झेंडू, गुलाब आणि ग्लॅडिओलस या फुलांची लागवड करून ते दरवर्षी सुमारे १८ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या या प्रयोगातून दुष्काळी परिस्थितीतही जिद्द, नियोजन आणि कष्टाच्या जोरावर शेती फायदेशीर ठरू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

आज बहुतांश शेतकरी सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पारंपरिक पिकांवर अवलंबून आहेत. मात्र, कधी अतिवृष्टी, तर कधी पावसाचा खंड, दुष्काळ आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीतून मिळणारे उत्पन्न मात्र घटत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या परिस्थितीचा विचार करून भानुदास आव्हाड यांनी चार वर्षांपूर्वी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बागायती फुलशेती करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या चार एकर शेतात त्यांनी झेंडू, गुलाब आणि ग्लॅडिओलस या फुलांची लागवड केली. सध्या त्यांच्या शेतात तब्बल १० हजार गुलाबाच्या झाडांची लागवड असून, आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली जाते. झेंडू आणि ग्लॅडिओलसच्या फुलांनीही शेत परिसर बहरून गेला आहे. विशेष म्हणजे गुलाबाच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याचे चित्र आहे.

फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी आव्हाड हे स्वतः शेतात मेहनत घेतात. त्यांच्या पत्नी सुनीता भानुदास आव्हाड याही शेतीकामात खांद्याला खांदा लावून साथ देतात. याशिवाय चार मजूर नियमितपणे काम करतात. दररोज फुलांची काढणी करून २०-२० फुलांचे गुच्छ तयार केले जातात. त्याच दिवशी हे गुच्छ चिखली, बुलढाणा आणि साखरखेर्डा येथील व्यापाऱ्यांना विक्रीसाठी पाठविले जातात. काही वेळा जालना येथील बाजारपेठेतूनही फुलांना मागणी येते.

फुलांचा ताजा माल वेळेत बाजारपेठेत पोहोचविता यावा, यासाठी त्यांनी स्वतःचे चारचाकी वाहनही खरेदी केले आहे. फुलशेतीत नियमित फवारणी, योग्य व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून पिकांची चांगली जोपासना करणे शक्य होत आहे.

त्यांचा मुलगा गजानन आव्हाड हा कृषी पदवीधर असून, त्याचेही वडिलांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड, बाजारपेठेचा अभ्यास, स्वतः शेतात राबण्याची तयारी आणि कुटुंबाची साथ या बळावर आव्हाड यांनी फुलशेतीत यश मिळविले आहे.

शेतीमध्ये केवळ मजुरांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वतःही शेतात उतरून काम करण्याची तयारी ठेवली, तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, हे भानुदास आव्हाड यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कृषी कार्याची दखल घेत यावर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने त्यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

दुष्काळ, नैसर्गिक संकटे आणि पारंपरिक शेतीतील अनिश्चितता यांवर मात करीत फुलशेतीतून आर्थिक प्रगती साधणारे भानुदास आव्हाड यांचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top