well recovered : शेतातील विहिरीच्या बांधकामादरम्यान तोल जाऊन पाण्यात पडलेल्या एका मजुराला वाचविण्यासाठी दुसऱ्या मजुरानेही विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. जवळा कुंभार शिवारातील आसेगाव ते अनसिंग मार्गावरील शेतात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

मृत्यूच्या विहिरीत उतरले जवान! ५५ फूट खोल विहिरीतून दोन मृतदेह बाहेर काढले
वाशिम : शेतातील विहिरीच्या बांधकामादरम्यान तोल जाऊन पाण्यात पडलेल्या एका मजुराला वाचविण्यासाठी दुसऱ्या मजुरानेही विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. जवळा कुंभार शिवारातील आसेगाव ते अनसिंग मार्गावरील शेतात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.
एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही बळी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळा कुंभार शेतशिवारात आसेगाव ते अनसिंग रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीचे बांधकाम सुरू होते. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी विहिरीच्या फर्म्यांमध्ये भरणा करण्यासाठी साईटवर मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना संतोष रामदास जामनिके (वय अंदाजे ४५, रा. अंबापूर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीतील पाण्यात पडले.
त्यांना बुडताना पाहून सोबत काम करणारे वसुदेव श्रीराम धोंगडे (वय अंदाजे ४०, रा. हिसई, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने त्यांनाही पाण्यातून बाहेर पडता आले नाही. या घटनेत दोन्ही मजुरांचा बुडून मृत्यू झाला.
पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण
घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेळके यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीव रक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी रवाना होण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार दीपक सदाफळे यांनी गोपाल गिरे, लखन खोडे, दत्ता मानेकर, नागेश राऊत, शुभम भोपळे, सागर डाके आणि हर्षल वानखडे या सहकाऱ्यांसह आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळ गाठले.
५५ फूट खोल विहिरीत धोकादायक बचावकार्य
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी विहिरीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित विहीर सुमारे ५५ फूट खोल असून, त्यात जवळपास २० फूट पाणी होते. विहिरीचे बांधकाम अर्धवट झालेले होते. आदल्या दिवशीच बांधकामासाठी फर्मे तयार करण्यात आले होते. त्यामुळे विहिरीत उतरणे आणि शोधकार्य करणे अत्यंत धोकादायक होते.
या प्रतिकूल परिस्थितीतही दीपक सदाफळे यांनी उपलब्ध परिस्थितीचा अभ्यास करून बचावकार्याचे नियोजन केले. त्यानंतर पथकातील जवानांनी आवश्यक सुरक्षा आणि बचाव साहित्याच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मजुरांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात जवानांना यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांसह नागरिकांची घटनास्थळी उपस्थिती
या बचावकार्यात आसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेळके, पोलीस जमादार नंदकिशोर भडके, शाम गायकवाड आणि पोलीस अंमलदार दादाराव भोयर उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत हेही बचाव पथकाशी सातत्याने संपर्कात होते. मृतांच्या नातेवाइकांसह गावातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती.
अत्यंत धोकादायक परिस्थितीतही बचाव पथकाने दाखवलेली तत्परता, नियोजन आणि साहस पाहून स्थानिक नागरिकांनी जवानांचे कौतुक केले. या घटनेची माहिती मंगरूळपीर तहसील कार्यालयाचे नाझर ईश्वर चव्हाण यांनी दिली.

