Mahabreaking

[breaking_news]

Farmers up :पाच हजारांचे अनुदान रखडल्याने शेतकरी आक्रमक; २६ नोव्हेंबरला पातूर तहसीलवर ठिय्या आंदोलनाचा इशारा!

Farmers up : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अद्यापही पातूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा झालेले नाही. शासनाची घोषणा होऊनही प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक विवंचनेत गेल्याचा आरोप शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे.

Farmers up

दुष्काळी मदतीनंतर आता पाच हजारांच्या अनुदानाचीही प्रतीक्षा; शेतकरी राजा ग्रुपचा प्रशासनाला अल्टिमेटम

राहुल सोनोने

दिग्रस बु. : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अद्यापही पातूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा झालेले नाही. शासनाची घोषणा होऊनही प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक विवंचनेत गेल्याचा आरोप शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याच्या वतीने करण्यात आला आहे.

यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि शेतीसाठी झालेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली दुष्काळी मदत अद्याप मिळालेली नसताना, दिवाळीपूर्वी जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

सामायिक क्षेत्र, फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणींचा फटका

शेतकरी राजा ग्रुपने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, काही शेतकऱ्यांच्या जमिनी सामायिक क्षेत्रात असल्यामुळे, तर काहींच्या फार्मर आयडी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनुदान वितरण रखडले आहे. शासनाने मदतीची घोषणा केली असली, तरी तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात असंतोष वाढत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची खरी गरज असताना अशा तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान वितरणाला गती देणे आवश्यक आहे. प्रशासनाने प्रलंबित प्रकरणांची तातडीने तपासणी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत अनुदान जमा करावे, अशी मागणी ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.

२५ नोव्हेंबरची मुदत; अन्यथा तहसीलवर ठिय्या!

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी राजा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन सादर केले. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत पातूर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत पाच हजार रुपयांचे अनुदान जमा करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

अन्यथा २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पातूर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि निर्धारित मुदतीत अनुदान वितरण पूर्ण करते का, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

निवेदन देताना शेतकरी राजा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित

यावेळी शेतकरी राजा ग्रुपचे रवि सोनोने, गोपाल पजई, शालिग्राम राऊत, रामदास धोत्रे, गुलाब अंभोरे, संतोष दुतोंडे, रवि गवई, गणेश पाटील, दशरथ सरदार, विनोद कडाळे, रहेमान खान, रमेश सोळंके, सचिन शेळके, रवींद्र खेकडे, रामेश्वर वाघमारे, सुहास उपर्वट, अनंता चिकटे, रूपेश कवाळकर यांच्यासह पातूर तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top