immersion of ashes : नातेवाइकाच्या अस्थिविसर्जनासाठी भालेगाव येथे आलेल्या ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी गावाकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सत्यभामा तेजराव जाधव (वय ६८, रा. किन्ही नाईक) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात मोटारसायकलवरील अन्य एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे अस्थिविसर्जनासाठी जमलेल्या शेकडो नातेवाइकांवर शोककळा पसरली.

भालेगावात काळाचा घाला; अस्थिविसर्जनाला आलेल्या वृद्ध महिलेचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
मेहकर : नातेवाइकाच्या अस्थिविसर्जनासाठी भालेगाव येथे आलेल्या ६८ वर्षीय वृद्ध महिलेचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी गावाकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सत्यभामा तेजराव जाधव (वय ६८, रा. किन्ही नाईक) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात मोटारसायकलवरील अन्य एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे अस्थिविसर्जनासाठी जमलेल्या शेकडो नातेवाइकांवर शोककळा पसरली.
अस्थिविसर्जनासाठी भालेगावकडे प्रवास
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका पोस्टवरून निर्माण झालेल्या वादातून भालेगाव येथील निलेश अशोकराव निकम यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आज भालेगाव येथे निलेश निकम यांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी किन्ही नाईक येथील सत्यभामा तेजराव जाधव या आज सकाळी बसने भालेगाव फाट्यावर उतरल्या. सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास त्यांनी शेतातील एका घरी चहा घेतला. त्यानंतर त्या आणि त्यांच्यासोबत असलेली आणखी एक महिला एका व्यक्तीच्या मोटारसायकलवरून भालेगाव गावाकडे निघाल्या.
खड्ड्यात आदळली मोटारसायकल; वृद्ध महिला ट्रॅक्टरखाली
भालेगाव फाट्यापासून अवघ्या फर्लांगभर अंतरावर असताना समोरून ऊस घेऊन येणारा ट्रॅक्टर वेगाने येत होता. याचदरम्यान मोटारसायकल रस्त्यावरील खड्ड्यात आदळली. त्यामुळे मोटारसायकलवरील सत्यभामा जाधव यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. दुर्दैवाने त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मोटारसायकलवरील अन्य महिला या अपघातात किरकोळ जखमी झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
अस्थिविसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये हळहळ
नातेवाइकाच्या अस्थिविसर्जनासाठी आलेल्या सत्यभामा जाधव यांच्यावर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने उपस्थित नागरिकांना मोठा धक्का बसला. काही क्षणांत आनंद-दुःखाच्या भावनांनी एकत्र जमलेला परिसर शोकमग्न झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भालेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

