cotton crop : कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. गोवर्धन नगर येथील गोविंद आयदान राठोड (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गोवर्धन नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पाणीटंचाईने सुकणारे पीक वाचविण्याची धडपड ठरली अखेरची; विद्युत शॉकने शेतकऱ्याचा बळी
रमेश खंडागळे
बीबी : कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. गोवर्धन नगर येथील गोविंद आयदान राठोड (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गोवर्धन नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद राठोड यांचे बीबी येथील गट क्रमांक ३८८ मध्ये शेत आहे. कपाशीचे पीक पाण्याअभावी सुकत असल्याने ते स्वतःच्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंपाद्वारे पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. पिकाला पाणी देत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वीज का गेली, हे पाहण्यासाठी ते शेजारील शेतातील विद्युत रोहित्राजवळ (डीपी) गेले.
डीपीच्या फ्यूजची तपासणी करीत असताना त्यांना अचानक विद्युत शॉक लागला. त्यामुळे ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कपाशीचे पीक वाचविण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
महावितरणचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच महावितरणने संबंधित वीजपुरवठा बंद केला. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच बीबी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह बीबी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी संजय टोपा चव्हाण (रा. गोवर्धन नगर) यांनी दिलेल्या माहितीवरून बीबी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक २७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण करीत आहेत.
विद्युत उपकरणांना स्वतः हात लावू नका : महावितरणचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे बीबी येथील सहाय्यक अभियंता डी. आर. वाभीटकर यांनी शेतकरी आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
“वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण असल्यास शेतकरी आणि नागरिकांनी संबंधित महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा कार्यालयात येऊन तक्रार नोंदवावी. विद्युत रोहित्र, फ्यूज किंवा अन्य विद्युत उपकरणांना स्वतः हात न लावता संबंधित प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनच दुरुस्ती करून घ्यावी,” असे त्यांनी सांगितले.
शेतातील पिके वाचविण्याच्या धडपडीत शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याने विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

