Mahabreaking

[breaking_news]

Demand:  पाच हजारांची मागणी, चार हजारांत तडजोड! जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

Demand: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप बुलढाणा जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

Demand

   कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्रासाठी लाचेचा आरोप; जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक आणि स्वीय सहाय्यकाविरुद्ध कारवाई

बुलढाणा : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप बुलढाणा जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

नोंदणी प्रमाणपत्रासाठी पाच हजारांची मागणी

या प्रकरणातील तक्रारदार २३ वर्षीय असून, ते खासगी क्षेत्रात इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नियमानुसार अर्ज सादर केला होता.

या प्रमाणपत्राच्या कामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुधीर महादेव तांदुळकर आणि जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक तथा प्रभारी स्वीय सहाय्यक विजय प्रल्हाद खर्चे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित अभियंत्याने १ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे केली होती.

पडताळणीत चार हजारांची मागणी निष्पन्न

तक्रारीच्या अनुषंगाने १ एप्रिल रोजी दुपारी १.१३ ते २.०८ या वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान विजय खर्चे यांनी तक्रारदाराकडे नोंदणी प्रमाणपत्राच्या कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीच्या नोंदीत नमूद आहे.

याच वेळी सुधीर तांदुळकर यांनी खर्चे यांच्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याची मागणी केली आणि तक्रारदाराला खर्चे यांना लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचेही पडताळणीत निष्पन्न झाल्याचे विभागाने म्हटले आहे.

दोन वेळा सापळा; मात्र लाच स्वीकारली नाही

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.४६ ते सायंकाळी ५.३६ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचला. मात्र, विजय खर्चे कार्यालयात उपस्थित नव्हते. तक्रारदाराने सुधीर तांदुळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलणे टाळल्याचे नमूद आहे. त्यानंतर तक्रारदाराचे कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयाबाहेर आणून देण्यात आले आणि काम झाल्याचे सांगण्यात आले. संशय निर्माण झाल्यामुळे या वेळी लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली नाही.

त्यानंतर २ जून २०२६ रोजी पुन्हा सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. मात्र, खर्चे कार्यालयात उपस्थित मिळाले नाहीत. तक्रारदाराने दूरध्वनीवर संपर्क साधला असता, आपल्याकडे संबंधित फाईल नसल्याचे सांगून भेट टाळल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.

यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला नसल्याने आणि लाचेची रक्कम स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, पडताळणीदरम्यान निष्पन्न झालेल्या लाचेच्या मागणीच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

१६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. १०२३/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ आणि १२ नुसार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत विजय प्रल्हाद खर्चे (वय ५२, वरिष्ठ सहाय्यक तथा प्रभारी स्वीय सहाय्यक) आणि सुधीर महादेव तांदुळकर (वय ४२, वरिष्ठ सहाय्यक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग) यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने कळविले आहे.

या कारवाईचे सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे यांनी काम पाहिले. पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले हे पर्यवेक्षक अधिकारी होते. अमरावती परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सुनील किनंगे आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लाचेची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन

शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन  पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी केले आहे.

तक्रारीसाठी संपर्क :

  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा : ०७२६२-२४२५४८
  • व्हॉट्सॲप क्रमांक : ९४०५०९१०६४
  • टोल फ्री क्रमांक : १०६४
  • ई-मेल : dyspacbbuldhana@mahapolice.gov.in

शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top