drone camera : मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिस विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा असतानाच रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी रात्री शिक्षक कॉलनी परिसरातील एका बंद घराच्या आवारात ड्रोन कॅमेरा काही वेळ फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. घरमालक किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य घरी नसताना हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वाडेगावात चोऱ्यांनंतर ड्रोनची दहशत; बंद घराच्या आवारात ड्रोन फिरल्याने ग्रामस्थ भयभीत
राहुल सोनोने
वाडेगाव : मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिस विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा असतानाच रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी रात्री शिक्षक कॉलनी परिसरातील एका बंद घराच्या आवारात ड्रोन कॅमेरा काही वेळ फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. घरमालक किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य घरी नसताना हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील शिक्षक सुधाकर कुरई यांचे संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरात कोणीही नसताना अचानक एक ड्रोन कॅमेरा त्यांच्या घराच्या आवारात आला आणि काही मिनिटे परिसरात घिरट्या घालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
कुरई यांनी घराच्या सुरक्षेसाठी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या हालचालीची माहिती मिळाली. सीसीटीव्ही प्रणालीद्वारे घटनेची छायाचित्रे त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आल्याने त्यांना या प्रकाराची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी तातडीने शेजारील नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती देऊन परिसरातील बंद घरांकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यामुळे ड्रोन कॅमेरा फिरत असल्याचा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, संबंधित ड्रोनचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी ढोरे, मुंडे आणि सिरसाठ यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. ड्रोन नेमका कोणाचा होता, तो रात्रीच्या वेळी बंद घराच्या आवारात का फिरत होता आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून परिसरात चोरीच्या घटनांची चर्चा आणि आता बंद घराच्या आवारात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे ड्रोनद्वारे घरांची पाहणी केली जात असल्यास त्यामागे कोणाचा हेतू आहे, याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा तपास करून ड्रोनचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

