Robbery : समृद्धी महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक अडवून चालकास मारहाण करत ट्रकसह कांदा लुटून नेल्याच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या पाच तासांत उकल करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि डोणगाव पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून ट्रक, कांदा आणि गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार असा एकूण ४१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या चारही आरोपींना 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ट्रकसह ४१.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; डोणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
डोणगाव : समृद्धी महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक अडवून चालकास मारहाण करत ट्रकसह कांदा लुटून नेल्याच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या पाच तासांत उकल करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि डोणगाव पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून ट्रक, कांदा आणि गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार असा एकूण ४१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.या चारही आरोपींना 28 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिराज ऐजाज अहमद (वय २८, रा. थोन, तहसील सिराथू, जिल्हा कौसंबी, उत्तर प्रदेश) हे दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या ताब्यातील CG-04-PP-9113 क्रमांकाच्या ट्रकमध्ये कांदा भरून मेहकर ते मालेगाव मार्गे समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जात होते. डोणगावजवळ आल्यानंतर MH-15-H-9004 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा ट्रक अडविला.
आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ट्रक जबरदस्तीने ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये ३० टन ५६० किलो कांदा होता. ट्रकची किंमत सुमारे २५ लाख रुपये, तर कांद्याची किंमत ११ लाख ५० हजार रुपये, असा एकूण ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरी करून आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर फिर्यादीने दि. २६ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून डोणगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३१७/२०२६, कलम ३०९(६), १२६ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याची तातडीने उकल करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व डोणगाव पोलिसांना दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि डोणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादीने दिलेले संशयित आरोपींचे वर्णन, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे तपास सुरू केला. तसेच समृद्धी महामार्ग पोलिसांचीही मदत घेण्यात आली. या सर्वांच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत चार आरोपींना ताब्यात घेतले.
चौघे आरोपी जेरबंद
या प्रकरणात पोलिसांनी १) तेजस विलास ठोमसे (वय २०), रा. गोरठाण, ता. निफाड, जि. नाशिक, २) गौरव हरीभाऊ पानसरे (वय २९), रा. पातूर शेंबे, ता. चांदवड, जि. नाशिक, ३) विश्वजित निवृत्ती ठोमसे (वय ३०), रा. पंचकेश्वर, ता. निफाड, जि. नाशिक, ४) अशुदेव दास गोबिद दास (वय ३२), रा. पश्चिम दांडीराहाट, जि. उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल यांना जेरबंद केले आहे.
४१ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून २५ लाख रुपये किमतीचा ट्रक, ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा ३० टन ५६० किलो कांदा आणि ५ लाख रुपये किमतीची स्कोडा कार, असा एकूण ४१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. गणेश इंगोले (ठाणेदार, डोणगाव), पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरदचंद्र गिरी, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, चालक पोहेकॉ. विलास भोसले (स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनि. विजय अजमीरे, पोकॉ. सहगल, पवन गाभणे, आनंद चोपडे, जाकिर चौधरी, अरुण सरदार, ज्ञानेश्वर घायाळ (पोलीस ठाणे डोणगाव) तसेच पोहेकॉ. राजू आडवे (तांत्रिक विभाग, बुलढाणा) यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या कारवाईत महामार्ग पोलिसांचीही मदत मिळाली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. गणेश इंगोले, पोलीस ठाणे डोणगाव करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

