Mahabreaking

[breaking_news]

Operation Prahar: ‘ऑपरेशन प्रहार’मध्ये गोवंश चोरी-तस्करीविरोधात मोठी कारवाई; तिघांना अटक

Operation Prahar: अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत गोवंश चोरी व तस्करीविरोधात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. खदान, चान्नी आणि अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तीन गुन्ह्यांचा समांतर तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, मोबाईल फोन, गोवंश व इतर साहित्य असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Operation Prahar

   दोन वाहने, मोबाईलसह ९.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अकोला : अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत गोवंश चोरी व तस्करीविरोधात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. खदान, चान्नी आणि अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तीन गुन्ह्यांचा समांतर तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, मोबाईल फोन, गोवंश व इतर साहित्य असा एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यातील अवैध धंदे, गोवंश चोरी व तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी दोन पथके तयार करून कारवाई सुरू केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोवंश चोरीचा छडा

खदान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्र. १४८९/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता तसेच चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या अप. क्र. ३३७/२०२६, कलम ३०३ (२) बीएनएस या चोरीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता.

खदान आणि चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या फुटेजमध्ये एकाच वाहनाचा वापर करून गोवंश चोरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

या तपासात मिर्झा शोएब बेग मिर्झा अझहर बेग (वय २६, रा. सोळाशे प्लॉट, अकोट फाईल, अकोला) याचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्ह्यांबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून होंडा अमेझ कार क्रमांक एमएच-४९-एफ-१६३८ आणि एक मोबाईल फोन, असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चोरीची गाय शोधून मालकाच्या ताब्यात

तपासादरम्यान खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली गाय आरोपीने ज्या ठिकाणी ठेवली होती, त्या परिसरात पोलिसांनी शोध घेतला. या शोधमोहिमेत काळ्या रंगाची गाय आढळून आली. फिर्यादीने सदर गाय आपली असल्याची ओळख पटविल्यानंतर ती त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

सध्या संबंधित आरोपी खदान पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे. त्याची कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्याचा ताबा चान्नी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासाठी घेण्यात येणार असून, पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

अकोट फाईलमध्ये गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करीविरोधातही कारवाई केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फातेमा हॉस्पिटल परिसरात नाकाबंदी करण्यात आली.

यावेळी एमएच-०४-एचएस-२०३१ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा एस वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने कोंबून दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.

या प्रकरणी पोलिसांनी मंगेश गजानन बाळापुरे (वय ३२, रा. दर्यापूर, जि. अमरावती) आणि शेख ऐफाज शेख एजाज (वय ३०, रा. शादाब नगर, अकोट फाईल, अकोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहन व जनावरे असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध अकोट फाईल पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे खदान, चान्नी आणि अकोट फाईल पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तीन गुन्ह्यांचा समांतर तपास तसेच गोवंश चोरी व तस्करीविरोधातील कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने एकूण ९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बि. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, सुलतान पठाण, फिरोज खान, भारकर धोत्रे, अमीत दुबे, अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, वसीमोद्दीन, एजाज अहमद, राहुल गायकवाड, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज चंदेल, आकाश मानकर, धिरज वानखडे, पवन डांबलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, भिमराव दिपके तसेच चालक विनोद ठाकरे, प्रविण कश्यप, रामकिसन डोईफोडे, मनिष ठाकरे, देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top