Legislative Council : महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. पाचही जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. अमरावती शिक्षक मतदार संघासाठी बुलढाण्यातून शिक्षक भारतीचे सुरेश देवकर आणि उध्दव सेनेचे दत्तात्रय लहाने यांच्यात चुरस आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल; 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 ला मतमोजणी
बुलढाणा : महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. पाचही जागांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.अमरावती शिक्षक मतदार संघासाठी बुलढाण्यातून शिक्षक भारतीचे सुरेश देवकर आणि उध्दव सेनेचे दत्तात्रय लहाने यांच्यात चुरस आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांचा निवडणुकीत समावेश आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार असल्याने त्यापूर्वी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
२९ सप्टेंबरला अधिसूचना
निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर २०२६ आहे.
यानंतर २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होईल. मतदानानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
विद्यमान सदस्यांसमोर पुन्हा संधीचे आव्हान
या पाच जागांवर सध्या कार्यरत असलेल्या सदस्यांमध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर यांचा समावेश आहे.
निवडणुकीची घोषणा झाल्याने आता संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि विविध संघटनांच्या पातळीवर निवडणूकपूर्व तयारीला वेग येणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांशी संपर्क वाढविणे, उमेदवारीसाठी पक्षांतर्गत चर्चा आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आचारसंहिता लागू
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून संबंधित पाचही मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसह विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेच्या तरतुदी लागू करण्याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टता देण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने याबाबत माहिती दिली असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संबंधित मतदारसंघांतील प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज होणार आहे.
उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू
विधान परिषदेच्या निवडणुकीची इच्छुक उमेदवारांनी आधीच तयारी सुरू केली आहे. शिक्षक भारतीचे सुरेश देवकर, उध्दव सेनेचे प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या सोबतच इतरही उमेदवार तयारी लागले आहेत.ऑक्टोबर महिन्यात या निवडणुकीची धामधुम राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष
आरक्षणाची मर्यादा ओलांडणार्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्यापही झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. एसआयआर प्रक्रीयेमुळे या निवडणुका पुन्हा लांबल्या आहेत.अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे, जिल्हा परिषदेसोबतच ग्रामपंचायत निवडणुकींकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

