Mahabreaking

[breaking_news]

Second marriage : पहिली फारकत नसतानाच दुसरे लग्न; १२ दिवसांत नवरीचा पोबारा! ६० हजारांच्या मध्यस्थीचा आरोप

Second marriage : पहिल्या पतीपासून फारकत (घटस्फोट) झालेली नसतानाही दुसरे लग्न केल्याचा प्रकार समोर आला असून, लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत नवरी घरातून बेपत्ता झाल्याने डोणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लग्न जुळवून देण्यासाठी मध्यस्थ महिलेने ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप वरपक्षाकडून करण्यात आला आहे. नवरीच्या शोधात वरपक्षाचे नातेवाईक तिच्या मूळ गावी पोहोचले असता नवरी आणि तिची मावशी तेथून निघून गेल्याचे समोर आले.

Second marriage

 लग्नाचा आनंद १२ दिवसांतच विरला; नवरी बेपत्ता, शोध घेताच मावशीसह फरार

डोणगाव : पहिल्या पतीपासून फारकत (घटस्फोट) झालेली नसतानाही दुसरे लग्न केल्याचा प्रकार समोर आला असून, लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत नवरी घरातून बेपत्ता झाल्याने डोणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लग्न जुळवून देण्यासाठी मध्यस्थ महिलेने ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप वरपक्षाकडून करण्यात आला आहे. नवरीच्या शोधात वरपक्षाचे नातेवाईक तिच्या मूळ गावी पोहोचले असता नवरी आणि तिची मावशी तेथून निघून गेल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणाचे लग्न जुळत नव्हते. दरम्यान, अकोला येथील एका महिलेने मध्यस्थी करून ६० हजार रुपये घेतल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर राहत असलेल्या ग्रामपंचायत परिसरात हे लग्न पार पडले.

३ सप्टेंबरला लग्न; १२ दिवसांतच नवरी बेपत्ता

लग्न जुळल्याने वरपक्षाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. ३ सप्टेंबर रोजी लग्न पार पडल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याचा सुखी संसार व्हावा, भविष्यात सोन्याचे दागिने करून द्यावेत, अशी स्वप्ने वरपक्ष रंगवत होता. मात्र, हा आनंद अवघ्या १२ दिवसांतच संपुष्टात आला.

१५ सप्टेंबर रोजी नवरा आणि त्याचा मोठा भाऊ कामावर गेले होते. सासू मंदिरात गेली होती, तर मोठ्या भावाची पत्नीही कामानिमित्त घराबाहेर होती. सायंकाळी सर्वजण घरी परतल्यानंतर नवविवाहित पत्नी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी परिसरात तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.

नवरीच्या मूळ गावी धाव; मावशीसह पोबारा

नवरी बेपत्ता झाल्याने संशय बळावला. त्यानंतर वरपक्षातील नातेवाईकांनी १६ सप्टेंबर रोजी सकाळी डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरीच्या मूळ गावी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने तिचे घर शोधण्यात आले. मात्र, वरपक्षाचे नातेवाईक गावात आल्याची माहिती मिळताच नवरी आणि तिची मावशी तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

यानंतर वरपक्षाने ग्रामपंचायतीत धाव घेत सरपंच आणि ग्रामस्थांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. सरपंच पती व ग्रामस्थांनी तत्काळ डोणगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी गावात पोहोचून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि संबंधितांना पोलीस ठाण्यात आणले.

पहिल्या लग्नाची फारकत झाली नसल्याचा वरपक्षाचा दावा

दरम्यान, संबंधित नवरीचे यापूर्वीच लग्न झाले असून, त्या लग्नातून तिची कायदेशीर फारकत झालेली नसल्याचा दावा वरपक्षाकडून करण्यात आला आहे. ही बाब लपवून मध्यस्थ महिलेच्या माध्यमातून दुसरे लग्न लावून देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात फसवणूक झाल्याचा आरोप करत वरपक्षाने कारवाईची मागणी केली आहे.

डोणगाव पोलिसांनी वरपक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, घटनेचे मूळ ठिकाण अकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे प्रथम फिर्याद दाखल करण्याचा सल्ला दिला. तसेच पुढील तपासात आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे वरपक्षाकडून सांगण्यात आले.

६० हजार रुपये घेऊन लग्न जुळवून देण्यात आल्याचा आरोप आणि लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत नवरी बेपत्ता झाल्याच्या या प्रकाराची सध्या डोणगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात पोलिस तपासानंतरच नेमके तथ्य समोर येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top