Public awareness: खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतमालक व शेतमजुरांना विषबाधा होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. एफएमसी कंपनीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेच्या प्रचार रथाला ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

प्रचार रथाला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखविली हिरवी झेंडी :शेतकरी-शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी प्रचार रथ; १२० गावांत होणार जनजागृती
आगाखान पठाण
अकोला : खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतमालक व शेतमजुरांना विषबाधा होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. एफएमसी कंपनीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेच्या प्रचार रथाला ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
या जनजागृती मोहिमेअंतर्गत प्रचार रथ जिल्ह्यातील १२० गावांमध्ये जाऊन शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करणार आहे. तसेच २० गावांमध्ये विशेष सभा घेऊन कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
मोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ५,५०० पत्रके, ३०० सुरक्षा किट वितरित करण्यात येणार असून १२० बॅनर लावून जनजागृती करण्यात येणार आहे. ही विशेष विषबाधा जनजागृती मोहीम ११ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीमधील कृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर, फवारणीची योग्य पद्धत आणि विषबाधा झाल्यास घ्यावयाची प्राथमिक खबरदारी याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
प्रचार रथाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा मीना, डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, महेंद्रकुमार मालके, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद अकोला, आरोग्य विभागाच्या प्रतिनिधी कु. गावंडे, जिल्हा शल्यचिकित्सक अकोला यांचे प्रतिनिधी श्री. हेमबाडे, सौ. अनुप्रिता जाधव, प्रतिनिधी उपविभागीय कृषी अधिकारी अकोला, सतीश दांडगे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला, शरद बाबरे, विभागीय अधिकारी, एफएमसी कंपनी तसेच शुभम बढे, जिल्हा प्रतिनिधी, एफएमसी कंपनी यांच्यासह कृषी विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कीटकनाशक फवारणी करताना योग्य ती खबरदारी घेऊन शेतकरी व शेतमजुरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच विषबाधेची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
– डॉ. तुषार जाधव
कृषी विकास अधिकारी,
जिल्हा परिषद, अकोला
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

