Mahabreaking

[breaking_news]

Uddhav Sena :कोरडा दुष्काळ जाहीर करा; उद्धवसेनेचा महायुती सरकारविरोधात आक्रोश

Uddhav Sena : मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील पिके करपू लागली असून शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Uddhav Sena

  शेतकरी संकटात, सरकार गप्प! पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत उद्धवसेना रस्त्यावर

अकोला : मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील पिके करपू लागली असून शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी ठरली असून अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे उदासीनतेने पाहत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी केला.

स्थानिक विश्रामगृह येथे शुक्रवारी दुपारी आमदार नितीन देशमुख यांच्या वतीने पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पश्चिम विदर्भावर कोरड्या दुष्काळाचे सावट असताना संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कापूस आणि सोयाबीनला हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला असून, शेतकऱ्यांना भूमिहीन व बेघर करण्याचे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे शिवसेनेचे कर्तव्य असल्याचे सांगत आमदार देशमुख यांनी पाचही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्याचे निर्देश दिले.

बैठकीला संपर्कप्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्कप्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, महिला आघाडी संपर्क संघटिका सागरताई पुरी, जिल्हा संघटिका डॉ. सरिता वाकोडे यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, जिल्हासंघटक, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अकोल्यात २२ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा

अकोला जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य भवन येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २१ सप्टेंबरला वाशिम, २३ सप्टेंबरला यवतमाळ, २८ सप्टेंबरला अमरावती, तसेच २९ आणि ३० सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी साधली चुप्पी

पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कपाशीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांवर भाजपचे स्थानिक खासदार आणि आमदार बोलायला तयार नसल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केला.

केंद्रासह राज्यात भाजपची सत्ता असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या शासनदरबारी मांडत नसल्याची टीका करत, “लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी केवळ पक्षवाढीत मश्गूल आहेत,” असा टोला दातकर यांनी लगावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top