Land dispute: तालुक्यातील जामवसु येथे जागेच्या वादाने क्रूरतेचा कळस गाठला. जागेवरून सुरू असलेल्या वादातून थेट घरात मालवाहू पिकअप वाहन घुसवून ७० वर्षीय वृद्ध महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची थरारक घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सरपंचासह चार जण जखमी झाले आहेत. सोनीबाई मखराम जाधव असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर सरपंच शेषराव मखराम जाधव, विद्या जाधव, वनिता जाधव आणि कविता राठोड हे जखमी झाले आहेत.

जामवसु येथे जागेच्या वादातून रक्तरंजित थरार; गावात चोख बंदोबस्त तैनात, आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
बबन इंगळे
बार्शीटाकळी : तालुक्यातील जामवसु येथे जागेच्या वादाने क्रूरतेचा कळस गाठला. जागेवरून सुरू असलेल्या वादातून थेट घरात मालवाहू पिकअप वाहन घुसवून ७० वर्षीय वृद्ध महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची थरारक घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सरपंचासह चार जण जखमी झाले आहेत. सोनीबाई मखराम जाधव असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर सरपंच शेषराव मखराम जाधव, विद्या जाधव, वनिता जाधव आणि कविता राठोड हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बबन दादाराव घुगे आणि जाधव कुटुंबीय यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरू होता. पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी जाधव कुटुंबीय १० सप्टेंबर रोजी जामवसु येथे एकत्र आले होते. पोळ्याच्या दिवशी सायंकाळी जाधव आणि घुगे कुटुंबीयांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोन्ही पक्ष बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आले होते.
मात्र, ११ सप्टेंबर रोजी सकाळी या वादाने गंभीर वळण घेतले. आरोपानुसार, जाधव कुटुंबीयांना संपविण्याच्या उद्देशाने बबन घुगे याने स्वतःच्या मालकीचे मालवाहू पिकअप वाहन वडिलांच्या नावावर असलेल्या घराकडे आणले आणि वाहन घरात घुसविले. यावेळी घरात असलेल्या सोनीबाई मखराम जाधव यांच्या अंगावर वाहन गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
ग्रामस्थांच्या मदतीने सोनीबाई यांना तातडीने अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी बबन घुगे हाही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनीही घटनेचा आढावा घेतला.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी आर.सी.पी.ची तुकडी तैनात करण्यात आली होती. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आनंद कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष पारधी, धाबा चौकीचे जमादार विष्णू ढोरे तसेच पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. गुन्ह्यात वापरण्यात आलेले मालवाहू पिकअप वाहन रात्री जप्त करण्यात आले.
जगदीश मखराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बबन दादाराव घुगे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

