SRPF jawan : येथून जवळच असलेल्या गुंज, ता. सिंदखेडराजा येथील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने साखरखेर्डा परिसरात खळबळ उडाली आहे.

एसएलआरमधून मानेवर गोळी झाडली; गुंजचा जवान गंभीर, संभाजीनगरात उपचार सुरू
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या गुंज, ता. सिंदखेडराजा येथील राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी पहाटे घडली. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने साखरखेर्डा परिसरात खळबळ उडाली आहे.
अजय माधवराव वाकोडे (वय २४), रा. गुंज, ता. सिंदखेडराजा, असे गंभीर जखमी जवानाचे नाव आहे. अजय वाकोडे हे जालना येथील एसआरपीएफ कॅम्पमध्ये कार्यरत असून, सुमारे दीड वर्षापूर्वी ते सेवेत दाखल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय वाकोडे हे सोमवारी रात्री कॅम्पमध्ये नियमितपणे कर्तव्यावर तैनात होते. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कॅम्पच्या आवारातच त्यांनी स्वतःकडील एसएलआर रायफलमधून मानेवर गोळी झाडली. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने कॅम्पमधील सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अजय वाकोडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.
सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, मानेवर गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी जवानाने वापरलेली एसएलआर रायफल ताब्यात घेतली असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण गुलदस्त्यात
अजय वाकोडे यांनी सेवेत दाखल होऊन अद्याप फारसा कालावधी झालेला नसताना कर्तव्यावर असताना एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक तणाव, कामाचा ताण किंवा अन्य कोणते वैयक्तिक कारण होते का, या विविध शक्यतांच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजय वाकोडे यांच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या सहकाऱ्यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. तपासातून आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
गुंज येथील अजय वाकोडे हे अल्पावधीतच एसआरपीएफ सेवेत रुजू झाले होते. कर्तव्य बजावत असताना घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह गुंज व परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

