Mahabreaking

[breaking_news]

Dalit family :सायकलचे उधारीचे पैसे मागितल्याने दलित कुटुंबावर हल्ल्याचा आरोप; तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Dalit family : सायकलच्या उधारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सावखेड भोई येथे घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात महिलेचा विनयभंग केल्यासह जीवे मारण्याची व गावातून हाकलून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Raid

‘पैसे मागण्याची तुमची औकात नाही’; जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीप्रकरणी तिघांवर गुन्हा

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सायकलच्या उधारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सावखेड भोई येथे घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात महिलेचा विनयभंग केल्यासह जीवे मारण्याची व गावातून हाकलून देण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सौ. सविता किशोर डोगरे (वय ४१, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीचे आरोपी बाबुराव सोनाजी राऊत यांच्याकडे सायकलचे काही पैसे येणे बाकी होते. सदर पैसे परत मिळावेत यासाठी फिर्यादीचे पती वारंवार आरोपीकडे मागणी करीत होते. नागपंचमी सणासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी पुन्हा पैसे मागितले असता आरोपीने एक-दोन दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मात्र, पैसे परत न दिल्याने २८ ऑगस्ट रोजी सकाळी फिर्यादी व त्यांचे पती घराबाहेर उभे असताना आरोपी बाबुराव राऊत हे गावातून जात होते. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर बबन शेटे व मंगेश दिलीप राऊत हेही असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी फिर्यादीच्या पतीने उधारीच्या पैशाबाबत विचारणा केली असता आरोपी संतप्त झाल्याचा आरोप आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादी व त्यांच्या पतीला अश्लील तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीने शिवीगाळ करू नये, असे सांगितल्यानंतर त्यांना लाथ मारून खाली पाडण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पतीची कॉलर पकडून मारहाण करण्यात आली. अन्य आरोपींनीही फिर्यादीच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या पतीला खाली पाडून फिर्यादीच्या केसांना धरून वाईट उद्देशाने त्यांच्या साडीचा पदर ओढल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर तेथून मोटारसायकलवरून जात असलेले राजू शिवदास जाधव व करण अर्जुन हिरे यांनी घटनास्थळी येऊन भांडण सोडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पोलिसांत तक्रार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी बाबुराव सोनाजी राऊत, ज्ञानेश्वर बबन शेटे आणि मंगेश दिलीप राऊत या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२), २९६, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोहेकॉ विनोद गवई यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास देऊळगाव राजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top