Soybean crops: बुलढाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात खरीप हंगामातील पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर पान कुरतडणाऱ्या अळीचा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोयाबीनवर संकटांची मालिका; पानांवर आळी, उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये धास्ती
पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात खरीप हंगामातील पिकांवर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर पान कुरतडणाऱ्या अळीचा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी यंदा अत्यंत खडतर ठरत आहे. मागील रब्बी हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची मोठ्या अपेक्षेने तयारी केली होती. त्यासाठी नगदी उत्पन्न देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात आले. परिसरात सोयाबीन, मका, मूग, उडीद, भुईमूग, नाचणी तसेच विविध भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, यंदाच्या हंगामातही विविध नैसर्गिक संकटे आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यंदा काही भागांत सोयाबीनच्या झाडांची वाढ अपेक्षेपेक्षा अधिक होत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच पान कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला असून ही अळी सोयाबीनची पाने खाऊन त्यांची चाळणी करीत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके खरेदी करून वारंवार फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून एवढा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन मिळेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
संकटांची मालिका
यंदाच्या हंगामात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर एकापाठोपाठ एक संकटे उभी ठाकली आहेत. सुरुवातीला काही ठिकाणी सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यानंतर दुबार पेरणीचे संकट ओढवले. पिकांची उगवण झाल्यानंतर पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला. आता सोयाबीन पीक जोमात आले असताना झाडांची अधिक वाढ, पान कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आणि मर रोगामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतकरी शेषराव सावळे यांनी सांगितले की, “मागील काही हंगामांपासून वातावरणातील बदल, अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत शेती करावी लागत आहे. विविध संकटांमुळे उत्पादन खर्च वाढत असला तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यंदा सोयाबीन पिकावर विविध संकटांचा विळखा पडल्याने आमच्या अपेक्षा मावळण्याची भीती निर्माण झाली आहे.”
योग्य वेळी फवारणीचे आवाहन
बुलढाणा तालुक्याचे कृषी अधिकारी अजय वाडे यांनी शेतकऱ्यांना योग्य नियोजन करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य वेळी अचूक औषधांची फवारणी करण्याचे आवाहन केले आहे. विविध रोग व किडींच्या प्रादुर्भावापासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मासरूळ परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने गावपातळीवर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून किडी व रोगांचे नियंत्रण, योग्य औषधांची निवड आणि फवारणीचे नियोजन याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

