three accused arrested : अकोला शहरातील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची बनावट कुलमुखत्यारपत्र (GPA) आणि खोट्या दस्तऐवजांच्या आधारे विक्री करून फसवणूक केल्याच्या गंभीर प्रकरणात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत तीन मुख्य आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. मलकापूर परिसरातील सुमारे पाच कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या प्लॉटच्या व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

८४ वर्षीय महिलेच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र; कोट्यवधींच्या मालमत्ता फसवणुकीचा पर्दाफाश
अकोला : अकोला शहरातील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची बनावट कुलमुखत्यारपत्र (GPA) आणि खोट्या दस्तऐवजांच्या आधारे विक्री करून फसवणूक केल्याच्या गंभीर प्रकरणात अकोला स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत तीन मुख्य आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. मलकापूर परिसरातील सुमारे पाच कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या प्लॉटच्या व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी सौ. शांता प्रकाश बाहेकर (वय ८४, रा. गाडेकुळ कॉलनी, अकोला) यांच्या मालकीचा मलकापूर येथील सर्वे क्रमांक ८ मधील प्लॉट क्रमांक २१ हा ५,०७५ चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे. या मालमत्तेबाबत आरोपींनी आपसात संगनमत करून एका महिलेला फिर्यादी शांता बाहेकर यांचे खोटे नाव धारण करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर उल्हासनगर व अकोला येथे बनावट कुलमुखत्यारपत्र तसेच खरेदीखतासंबंधी खोटे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित प्लॉटची विक्री करून सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे पाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना आरोपींचा तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.
गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने आरोपींचा माग काढत अवघ्या दोन तासांत राहुल अशोकराव जाधव (वय ४३, रा. नायगाव, जुने शहर, अकोला), प्रियांका लक्ष्मण पाटील ऊर्फ प्रियांका नागेश चव्हाण (वय ३०, रा. सरस्वती नगर, रिंग रोड, अकोला) आणि आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण (वय ३०, रा. संतोष नगर, मलकापूर, अकोला) या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
सहा दिवसांची पोलिस कोठडी
या प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. आरोपींकडून बनावट दस्तऐवज तयार करण्यासंदर्भात तसेच या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बनावट कुलमुखत्यारपत्र आणि खरेदीखत तयार करण्यामागे नेमका कोणाचा सहभाग होता, ही कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींकडून मिळणारी माहिती, जप्त करण्यात येणारे दस्तऐवज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची पुढील दिशा निश्चित केली जात आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अकोला पोलिस दलाने नागरिकांना मालमत्ता, प्लॉट, जमीन किंवा घराची खरेदी-विक्री करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मालमत्तेसंबंधी दस्तऐवज, कुलमुखत्यारपत्र आणि मालकी हक्काची कागदपत्रे यांची दुय्यम निबंधक कार्यालय अथवा कायदेशीर तज्ज्ञांकडून पूर्ण पडताळणी करून घ्यावी. संशयास्पद व्यवहार किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक निलेश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी शेख हसन, फिरोज खान, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, एजाज अहमद, धीरज वानखडे, राज वंदेल, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतीश पवार तसेच महिला पोलिस कर्मचारी तुळसा दुबे, मेघा मुळे आणि चालक ग्रेड पोलिस उपनिरीक्षक विनोद ठाकरे यांनी सहभाग घेतला.

