tipper and ST bus: भरधाव बस आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन टिप्पर चालक जागीच ठार तर एसटी बस चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी ४ वाजेच्या सुमारास चिखली-खामगाव मार्गावरील बोरगाव वसू फाट्याजवळ घडली. या अपघातात बसमधील काही प्रवासीही जखमी झाले.

बोरगाव वसू फाट्यावर भीषण अपघात; टिप्पर चालकाचा मृत्यू, बसचालकाचे दोन्ही पाय निकामी
चिखली : भरधाव बस आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन टिप्पर चालक जागीच ठार तर एसटी बस चालक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी ४ वाजेच्या सुमारास चिखली-खामगाव मार्गावरील बोरगाव वसू फाट्याजवळ घडली. या अपघातात बसमधील काही प्रवासीही जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर येथून अकोलाकडे निघालेल्या एसटी बसला बोरगाव वसू फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच २८ एबी ८२२८ क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टिप्परच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. टिप्परची केबिन मोठ्या प्रमाणात दबली गेल्याने चालक सचिन वाघ (रा. संभाजीनगर, चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात एसटी बसचालक बाळू खेडकर (छत्रपती संभाजीनगर बस आगार) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील काही प्रवासीही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी चिखली येथील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त टिप्पर हा हातणी येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन यंत्रणांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदतकार्य करत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चिखली-खामगाव मार्गावर अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरच असल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित यंत्रणांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवल्यानंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

