Mahabreaking

[breaking_news]

Eid-e-Milad :बाळापूरमध्ये ईद मिलादुन्नबीचा भव्य जुलूस; १० हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Eid-e-Milad : पैगंबर हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या विलादतीच्या मुबारक प्रसंगानिमित्त बाळापूर शहरात ईद मिलादुन्नबीचा भव्य जुलूस धार्मिक उत्साह, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात काढण्यात आला. यंदाच्या जुलूसमध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. लहान मुले, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Eid-e-Milad

  धार्मिक उत्साह अन् बंधुभावाचा संदेश; बाळापूरचा ईद मिलादुन्नबी जुलूस थाटात

बाळापूर : पैगंबर हजरत मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या विलादतीच्या मुबारक प्रसंगानिमित्त बाळापूर शहरात ईद मिलादुन्नबीचा भव्य जुलूस धार्मिक उत्साह, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात काढण्यात आला. यंदाच्या जुलूसमध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. लहान मुले, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

जुलूसला जुन्या शहरातील बाळापूर जामा मशिदीतून सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करीत जुलूस दरगाह चौकाच्या दिशेने पुढे गेला. जुलूसमधील घोडे विशेष आकर्षण ठरले. शहरातील विविध मोहल्ल्यांमध्ये ठिकठिकाणी पंडाल उभारण्यात आले होते. अनेक पंडालमध्ये डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. धार्मिक घोषणा आणि मिलाद पठणामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

जुलूसदरम्यान ‘अल्लाहु अकबर’, ‘या रसूल अल्लाह’, ‘नबीचा दामन सोडणार नाही’ अशा धार्मिक घोषणा देण्यात येत होत्या. सहभागी नागरिक मिलाद पठण करीत उत्साहात जुलूससोबत पुढे जात होते.

आमदार नितीन देशमुख यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

दुपारी सुमारे ३.४५ वाजता बाळापूरचे आमदार नितीन देशमुख जुलूसमध्ये सहभागी झाले. त्यांनी दरगाह चौक ते जामा मशीद या मार्गावरील सुमारे ८ ते १० पंडालांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष मोहम्मद जमीर (जम्मू सेठ), नगर पालिका उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे यांचीही उपस्थिती होती. आमदार नितीन देशमुख आणि मोहम्मद जमीर यांच्या हस्ते मुलांना मिठाई, बिस्किटे व खीरचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना शरबत देण्यात आले.

जुलूसमध्ये बाबू साहेब, रहमतुल्लाह खान बीकेबी, आसिफ शाह आणि आरिफ अरमानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. स्थानिक पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधीही जुलूसच्या वृत्तांकनासाठी उपस्थित होते. जुलूसच्या नियोजन व व्यवस्थापनात अंजुमन ट्रस्टचे कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

चोख पोलिस बंदोबस्त

जुलूसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी एसआरपीची एक प्लाटून, ५० होमगार्ड, ४० पोलिस कर्मचारी आणि पाच पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते. पोलिस बंदोबस्तामुळे जुलूस शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

रात्री ७.३० वाजता समारोप

जुलूसचा रात्री सुमारे ७.३० वाजता समारोप झाला. दरगाह शरीफुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह यांच्या दरबारात फातेहा-ख्वानी करण्यात आली. त्यानंतर नियाजचे वाटप करून जुलूसचा विधिवत समारोप करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमादरम्यान धार्मिक उत्साहासोबतच शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top