Journalists : लोकशाहीच्या बळकटीकरणात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पत्रकार हा केवळ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नाही, तर समाजाला योग्य दिशा दाखविणारा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.

ग्रामीण पत्रकारिता ही पत्रकारितेचा कणा; चंद्रपूर जिल्हास्तरीय मेळाव्यात गुणवंतांचा गौरव
चंद्रपूर : लोकशाहीच्या बळकटीकरणात पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पत्रकार हा केवळ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नाही, तर समाजाला योग्य दिशा दाखविणारा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. यावेळी राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, राज्य प्रवक्ता अनंत गावंडे, राज्य निमंत्रक गोपाल चव्हाण, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, जिल्हा कार्याध्यक्ष कुकु सहानी, कोकण विभाग प्रमुख प्रभाकर असवले, रायगड जिल्हाध्यक्ष रमेश कदम आणि अशोक असवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण पत्रकारिता हा पत्रकारितेचा कणा : श्रीपाद अपराजित
ग्रामीण पत्रकारिता ही संपूर्ण पत्रकारितेचा कणा असून ग्रामीण भागातील पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. मात्र तंत्रज्ञान बदलले तरी सत्यता, अचूकता, निष्पक्षता, जनहित आणि सामाजिक बांधिलकी ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये कायम राहिली पाहिजेत, असे मार्गदर्शन श्रीपाद अपराजित यांनी केले.
वेगापेक्षा बातमीची विश्वसनीयता महत्त्वाची : मुनगंटीवार
डिजिटल युगात बातमी प्रसारित करण्याचा वेग वाढला असला तरी वेगापेक्षा बातमीची विश्वसनीयता आणि सत्यता अधिक महत्त्वाची आहे. अपुरी माहिती, अफवा अथवा अप्रमाणित संदेशांना बातमीचे स्वरूप न देता तथ्यांची पडताळणी करूनच वृत्त प्रसिद्ध करणे ही पत्रकारांची सामाजिक जबाबदारी आहे. ग्रामीण पत्रकार प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून ग्रामीण भागातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी : गजानन वाघमारे
ग्रामीण पत्रकारांना संघटित करून त्यांच्या अडचणी शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे. ती भूमिका आम्ही बजावत आहोत. ग्रामीण पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही संवेदनशील बाब असून पत्रकार संरक्षण कायद्याची होत नसलेली अंमलबजावणी चिंतेची बाब आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांनी केली.
तालुका अध्यक्षांचा विशेष सत्कार
मेळाव्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या विविध तालुक्यांच्या अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सैय्यद मुमताज अली (कोरपना), विशाल प्रभुदास डुंबेरे (बल्लारशाह), प्रविण गेडाम (सावली), अशपाक शेख (वरोरा), सुरेश डांगे (चिमूर), रुपेश निमसरकर (पोंभुर्णा), श्रीकृष्ण गोरे (राजुरा), लक्ष्मीकांत कामतवार (सिंदेवाही), शंकर चव्हाण (जिवती) आणि नितीन बडोले (नागभीड) यांचा सत्कार करण्यात आला.
गुणवंतांचा गौरव
शैक्षणिक क्षेत्रातील सोहम प्रकाश कातराणी, प्रियल प्रकाश हांडे, सुहानी किशोर माहूरकर, कु. निशिंका शशिकांत कामतवार, डॉ. मयुरी अनिल हेढे; क्रीडा क्षेत्रातील विहान प्रवीण जीवने, सखी पांडुरंग दोरखंडे, डॉ. ज्योती देऊळकर; तसेच सामाजिक क्षेत्रातील सौ. छबुताई मनोज बैरागड आणि श्रीमती कल्पना ओमप्रकाश कोकासे यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रातील धुर्योधन विलास धोंगडे (दै. पुण्यनगरी), गणेश अशोक लोंढे (दै. देशोन्नती, नांदा फाटा-कोरपणा), प्रविण बाबूराव गेडाम (सिटी न्यूज, सावली), संदीप रत्नाकर बांगडे (दै. लोकमत, सिंदेवाही), महेंद्र महादेव कोवले (दै. नवजीवन, वासेरा), साईनाथ पुरुषोत्तम कुचनकर (उपसंपादक, दै. लोकमत), हितेश राजनहिरे (महाराष्ट्र न्यूज, वरोरा) आणि अमन आफताब कुरेशी (सिंदेवाही) यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश सोलापन यांनी केले. मार्गदर्शन धर्मेश निकोसे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद पन्नासे, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अनिल देठे यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, प्रभाकर आवारी, सहसचिव कॉमा, प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे, विकी गुप्ता, सी. आर. टेंभरे, अशोक गुरुवाले यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

