Dahid Phata-Dhad road : बुलढाणा तालुक्यातील दहिद फाटा ते धाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, लहान-मोठी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

मका-सोयाबीन-कापूस वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग खड्ड्यात; दुरुस्तीच्या आश्वासनांवर नागरिकांचा संताप
पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील दहिद फाटा ते धाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, लहान-मोठी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास
दहिद फाटा ते धाड हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून, तो अनेक गावांना तसेच मोठ्या शहरांना जोडतो. या मार्गावरून शेतकऱ्यांचा मका, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला धाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेला जातो. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अन्य वाहनांची या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते.
याशिवाय खनिज वाहतूक करणारे टिप्पर, ट्रॅक्टर, पिकअप आणि व्यापाऱ्यांची मालवाहतूक करणारी अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात धावत असतात. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची स्थिती आणखी खराब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक वर्षांपासून मागणी; आश्वासनांनंतरही रस्ता जैसे थे
या रस्त्याची दुरवस्था अनेक वर्षांपासून कायम असून, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय झालेला नसल्याचा आरोप आहे. संतप्त नागरिकांनी यापूर्वी अनेकदा रस्ता बंद आंदोलनही केले. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुरुस्तीची तात्पुरती आश्वासने मिळतात; मात्र काही काळानंतर त्याचा विसर पडत असल्याने रस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. रात्री-अपरात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने प्रशासनाने आणखी विलंब न करता उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘खड्डे जीवघेणे बनले; तातडीने दुरुस्ती करा’
दहिद फाटा ते धाड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना आर्थिक नुकसान, अपघाताचा धोका आणि दैनंदिन प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया सोयगावचे माजी सरपंच समाधान भाऊ बुधवत यांनी व्यक्त केली.
लवकरच दुरुस्ती; तात्पुरते खड्डे बुजविणार
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश भागुरे म्हणाले, “सदर रस्त्याची सद्यस्थिती आमच्या निदर्शनास आली आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी योग्य असून त्याची नोंद घेण्यात आली आहे. लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम तातडीने करण्यात येईल. हा रस्ता मंजूर झालेला असून कायमस्वरूपी काम पुढील टप्प्यात करण्यात येईल.”

