girl goes missing : चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेतून १३ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. २४ सप्टेंबरपासून मुलीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चान्नी पोलिसांत तक्रार; मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम
राहुल सोनोने
दिग्रस बू. : चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेतून १३ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे. २४ सप्टेंबरपासून मुलीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांगरताटी येथील एक कुटुंब मागील दहा-बारा वर्षांपासून आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेत मजुरीसाठी वास्तव्यास आहे. त्यांच्याशेजारी मेहकर तालुक्यातील लोणार येथील एक कुटुंबही राहत असल्याचे सांगण्यात आले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी पहाटे शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एका मुलाने अल्पवयीन मुलीला झोपेतून उठवून कुठेतरी नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत मुलीच्या आईने संबंधित मुलाकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला.
यानंतर २५ सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार चान्नी पोलिसांत देण्यात आली. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी संबंधित मुलाविरुद्धही तक्रार करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, चार दिवस उलटूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
‘मुलीला शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एका मुलाने झोपेतून उठवून कुठेतरी नेऊन लपवून ठेवल्याचा संशय आहे. चान्नी पोलिसांत तक्रार करूनही चार दिवसांत मुलीचा शोध लागलेला नाही,’ अशी व्यथा अल्पवयीन मुलीच्या आईने व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचे ७२ तासांचे अल्टिमेटम
घटनेची माहिती मिळताच आदिवासी ग्रामस्थांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चान्नी पोलिस ठाण्यात धडक देत मुलीचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तत्काळ प्रभावी कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिव मीनाताई इंगळे, अर्चना डाबेराव, तालुका अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, युवक आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत तायडे, दिनेश गवई, राणा डाबेराव, इम्रान खान, मंगेश लोखंडे, संजय पोचपोर, अशोक अंभोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी बेपत्ता मुलीचा तातडीने शोध घ्यावा तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. मुलीचा शोध न लागल्यास आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला असून, ७२ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता असून, पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून मुलीचा सुरक्षित शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

