57 Lakh Water Supply Scheme Stalled : तालुक्यातील मंगरुळ (ई.) येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात निष्प्रभ ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करीत 5 मे पासून पंचायज समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अधिकाऱ्यानी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची 7 मे रोजी सांगता करण्यात आली.

कागदावर योजना पूर्ण, गाव मात्र तहानलेले; प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
चिखली : तालुक्यातील मंगरुळ (ई.) येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात निष्प्रभ ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करीत 5 मे पासून पंचायज समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. अधिकाऱ्यानी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची 7 मे रोजी सांगता करण्यात आली.
.मंगरुळ ई. येथे सन २०२० मध्ये जिल्हा परिषदेकडून धरणामध्ये विहीर खोदण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मोटार पंप, वीज जोडणी, जलवाहिनी तसेच इतर आवश्यक कामांसाठी सुमारे ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. २०२१ मध्ये संबंधित काम पूर्ण झाल्याचे दाखवत योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात गावकऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळाला नसल्याचा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला होता.
विशेष म्हणजे, धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे. विहीर, मोटार पंप, पाइपलाइन आणि गावात लाखो लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. तरीदेखील गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “योजना कागदावर पूर्ण, पण प्रत्यक्षात बंद” अशी टीका होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात ठेकेदार, ग्रामपंचायत प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यापैकी नेमका दोषी कोण, याची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी ३० एप्रिल रोजी ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढला होता. मात्र त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
निळकंठ गवते, भरत बांडे, समाधान गावंडे, सुखदेव डोके, प्रकाश गवते, रामप्रसाद सुरुशे, अनिल सुरुशे, परमेश्वर सुरुशे, श्रीकृष्ण सुरुशे, अंकुश सुरुशे, विठ्ठल बोर्डे, लक्ष्मण सुरुशे आणि गुलाबराव सुरुशे हे ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश मिळाले असून प्रशासनाने सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी इंजि. वाघमारे (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग), प्रभारी बीडीओ पोंफळे साहेब, नायब तहसीलदार गायकवाड यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन सकारात्मक तोडगा निघाला. तसेच राष्ट्रवादी नेते दराडे सर यांच्या वतीने उपोषणाची सांगता करण्यात आली.

