Mahabreaking

[breaking_news]

  Navodaya Entrance Exam :नवोदय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद शाळांची दमदार कामगिरी; 36 विद्यार्थ्यांची निवड

Navodaya Entrance Exam : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात आलेल्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 36 विद्यार्थी निवडले गेल्याने राज्यात जिल्ह्याने आपला ठसा उमटवला आहे.

  Navodaya Entrance Exam

 ग्रामीण विद्यार्थ्यांचा झेंडा उंचावला; नवोदयमध्ये बुलढाण्याचा दबदबा

बुलढाणा : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात आलेल्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 36 विद्यार्थी निवडले गेल्याने राज्यात जिल्ह्याने आपला ठसा उमटवला आहे.

सीबीएसई बोर्डाकडून दरवर्षी जिल्हास्तरावर जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी सामायिक परीक्षा घेतली जाते. यंदा जानेवारी महिन्यात झालेल्या या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात जिल्हा परिषद शाळांतील 36 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांना शेगाव तालुक्यातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत निवासी स्वरूपात, सीबीएसई बोर्ड संलग्न शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध होणार आहे.

तालुकानिहाय निकालात लोणार तालुक्यातील 8, सिंदखेडराजा तालुक्यातील 6, चिखली तालुक्यातील 5, खामगाव तालुक्यातील 4, मेहकर तालुक्यातील 3, तर संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा आणि मोताळा तालुक्यातील प्रत्येकी 2 तसेच शेगाव व देऊळगाव राजा तालुक्यातील प्रत्येकी 1 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

नियमित सराव, अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपेढीची निर्मिती आणि जादा तासिकांमधून केलेल्या तयारीमुळे हे यश मिळाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. तसेच सराव परीक्षा, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी नमूद केले.

 

तालुकानिहाय पात्र विद्यार्थी संख्या :

लोणार – 8

सिंदखेडराजा – 6

चिखली – 5

खामगाव – 4

मेहकर – 3

संग्रामपूर – 2

मलकापूर – 2

नांदुरा – 2

मोताळा – 2

शेगाव – 1

देऊळगाव राजा – 1

 

या निकालामुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी जिल्हा परिषद सदैव कटिबद्ध राहील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी सांगितले.

नियमित सराव आणि जादा तासिकांमुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले असून, जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. या यशासाठी सर्व शाळा व शिक्षकांचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top