electric shock : बांधकामस्थळी पाणी मारत असताना मेन लाईनच्या विजेचा तीव्र धक्का बसून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (दि. ३१ जानेवारी) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा, शिवणी आरमाळ येथील प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२, रा. शिवणी आरमाळ, ह. मु. देऊळगाव मही) असे मृतकाचे नाव आहे.

देऊळगाव मही येथील घटना, घराचे स्वप्न राहीले अधुरेच
देऊळगाव राजा/ देऊळगाव मही : बांधकामस्थळी पाणी मारत असताना मेन लाईनच्या विजेचा तीव्र धक्का बसून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी (दि. ३१ जानेवारी) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा, शिवणी आरमाळ येथील प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२, रा. शिवणी आरमाळ, ह. मु. देऊळगाव मही) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील छत्रपती चौक परिसरात संतोष आरमाळ यांच्या नवीन जागेवर बांधकाम सुरू होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम पूर्ण झालेल्या भागात पाणी मारण्यासाठी गेले होते. यावेळी घरासमोरून जाणाऱ्या वीजवाहक तारेचा त्यांना अचानक जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे संतोष आरमाळ तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. घटनेनंतर परिसरातील नातेवाईकांनी तात्काळ धाव घेत त्यांना जखमी अवस्थेत देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. जालना येथील कलावती रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मृतक संतोष आरमाळ हे जिल्हा परिषद शाळा, अंढेरा (सेवानगर) येथील शिक्षक हरी आरमाळ यांचे वडील होत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

