Kharif season : गेल्या अनेक वर्षांपासून खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींचे संकट शेतकऱ्यांवर ओढवते. यंदाही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार, ढगफुटी सदृश्य पावसाने व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीमुळे खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.तालुक्यात काढणीला आलेले साेयाबीन पाण्यात गेले असून कपाशीही वाहून गेली आहे. त्यामुळे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी,अशी मागणी हाेत आहे.

काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात; कपाशीवरही संकट
बबन इंगळे
बार्शीटाकळी : गेल्या अनेक वर्षांपासून खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींचे संकट शेतकऱ्यांवर ओढवते. यंदाही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार, ढगफुटी सदृश्य पावसाने व विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीमुळे खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.तालुक्यात काढणीला आलेले साेयाबीन पाण्यात गेले असून कपाशीही वाहून गेली आहे. त्यामुळे, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी,अशी मागणी हाेत आहे.
सध्या तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर सुरू असून काढणीला आलेले सोयाबीन आणि बहरलेली कपाशी पिके मातीमोल होत आहेत. नदी, नाले, तलाव, पाझर तलाव आणि मोठ्या प्रकल्पांच्या परिसरात पाणी तुडुंब भरल्याने सोयाबीनच्या शेंगा गळून पडत आहेत. तर कपाशी पिक पिवळसर पडून बहर लागत नाही, असे चित्र सर्वत्र दिसत आहे.
सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत खरीप हंगाम सुरळीत असला तरी आता पिक काढणीच्या वेळीच ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या दारोदारी जाणारे लोकप्रतिनिधी मात्र शेतकऱ्यांच्या या संकटाकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनदेखील फक्त कागदी कामकाजात गुंतलेले असून प्रत्यक्ष पाहणीसाठी कुणी पुढे आलेले नाही.
दरवर्षी एक रुपयात काढला जाणारा पिक विमा यावर्षी ठरवून दिलेली रक्कम भरून शेतकऱ्यांनी घेतला. मात्र पिक काढणीनंतर झालेल्या नुकसानीबाबतची तक्रार स्वीकारली जात नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

दरम्यान, सप्टेंबरपासून अनेक भागांत सोयाबीनवर यलो मोजॅक या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिके परिपक्व होण्यापूर्वीच पिवळी पडली आहेत. तसेच कपाशीवर बोंड अळीचे आक्रमण हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांच्या या संकटाकडे पिक विमा कंपनी आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

