Mahabreaking

[breaking_news]

water supply :विहीर तुडुंब, तरी काटेपांग्रीकरांची तहान कायम! आठ-आठ दिवस पाणीपुरवठा बंद असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

water supply : गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही काटेपांग्री गावातील नागरिकांना आठ-आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठ्याची विहीर चोहोबाजूंनी पाण्याने भरलेली असते, मोटारपंपही सुरू असतो; मात्र गावातील नळ कोरडेच राहत असल्याने हे पाणी नेमके जाते कुठे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी गजानन काटे आणि दिलीप थिगळे यांनी केली आहे.

water supply

मोटारपंप सुरू, विहिरीत मुबलक पाणी; मग गावात पाणी जाते कुठे? काटेपांग्रीकरांचा ग्रामपंचायतीला सवाल

साखरखेर्डा : गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही काटेपांग्री गावातील नागरिकांना आठ-आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठ्याची विहीर चोहोबाजूंनी पाण्याने भरलेली असते, मोटारपंपही सुरू असतो; मात्र गावातील नळ कोरडेच राहत असल्याने हे पाणी नेमके जाते कुठे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. संबंधित पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी गजानन काटे आणि दिलीप थिगळे यांनी केली आहे.

काटेपांग्री गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वीही केली होती. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी म्हस्के यांना माहिती देण्यात आली होती. त्यावेळी, ‘पाणीपुरवठा व्यवस्थित होतो की नाही, याची मला माहिती नाही; मात्र या प्रकरणात लक्ष घालतो,’ असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

काटेपांग्री तलावाच्या पायथ्याशी असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीच्या चोहोबाजूंनी पाणी वाहत असून, पाण्याचा एक मोठा प्रवाह विहिरीत सोडण्यात आला आहे. त्यामुळे ही विहीर २४ तास पाण्याने तुडुंब भरलेली असते. मोटारपंपही सुरू असतो. असे असतानाही गावात आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत अधिकारी म्हस्के आणि प्रशासकीय सरपंच यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा अपव्यय अथवा वितरणातील त्रुटी शोधाव्यात आणि गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाझर तलावातील पाण्याचा अपव्यय रोखण्याची गरज

दुसरीकडे, यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता काटेपांग्री येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून वाया जात असल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या पाण्याचा उपयोग परिसरातील अनेक शेतकरी सिंचनासाठी करीत आहेत, तर उर्वरित पाणी सावंगी माळी तलावात जात आहे. मात्र, पाण्याचा हा प्रवाह आणि उपसा यावर नियंत्रण नसल्याने भविष्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सावंगी माळी तलावात सध्या जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही तलावातून अनेक मोटारपंपांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. हा उपसा असाच सुरू राहिल्यास जानेवारी महिन्यातच तलाव कोरडा पडण्याची शक्यता गजानन काटे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाण्याचा अपव्यय आणि अनियंत्रित उपसा रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

एकीकडे गावातील पाणीपुरवठ्याची विहीर तुडुंब भरलेली असताना दुसरीकडे ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करावी आणि नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top