Water scheme : मेहकर तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या लोणी गवळी गावातील जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेली कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. योजना मंजूर होऊनही गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच कंत्राटदाराच्या कामकाजावर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

‘जल जीवन’ योजनेवर खर्च कोट्यवधींचा, गावकऱ्यांच्या नशिबी टँकरचे पाणी; आंदोलनाला आमदार सिद्धार्थ खरात यांचा पाठिंबा
डोणगाव : मेहकर तालुक्यातील राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या लोणी गवळी गावातील जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेली कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. योजना मंजूर होऊनही गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तसेच कंत्राटदाराच्या कामकाजावर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
लोणी गवळी गावासाठी जल जीवन मिशनअंतर्गत तब्बल ४ कोटी ५६ लाख २६ हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र, योजनेचे काम अपेक्षित पद्धतीने झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व सरपंचांना विश्वासात न घेता कामात हलगर्जीपणा केल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील संपूर्ण उन्हाळ्यात गावाला पुरेसा पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली. अनेक कुटुंबांना पदरमोड करून टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागले. पावसाळ्यातही पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
आंदोलकांनी गावाला तातडीने स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुरू करावा, पाणीपुरवठा योजनेवर आतापर्यंत खर्च झालेल्या निधीचा संपूर्ण लेखी हिशोब जनतेसमोर मांडावा तसेच योजनेच्या कामात दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
जोपर्यंत लोणी गवळी गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार प्रशांत पाटील, माजी उपसरपंच साहेबराव खंडारे, संतोष भांबे-पाटील, अंगदराव भालेराव आणि शरद चंद्रे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार सिद्धार्थ खरात यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी डोणगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार इंगोले, मेहकर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मवाळ, नायब तहसीलदार, तलाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.
या आंदोलनाला गावातील महिला, युवक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, पाणीप्रश्नासारखा मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल प्रशांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे.

