Victim dies : बाळापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला शनिवारी अत्यंत दुःखद वळण लागले. अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आरोपीला तातडीने अटक करून निष्पक्ष व वेगवान तपास करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

बाळापूर हादरले; अल्पवयीन पीडितेच्या निधनानंतर संतापाची लाट, निष्पक्ष तपासाची मागणी
बाळापूर : बाळापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला शनिवारी अत्यंत दुःखद वळण लागले. अनेक दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आरोपीला तातडीने अटक करून निष्पक्ष व वेगवान तपास करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बाळापूर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गंभीर मानसिक धक्का बसल्याने पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावत गेली आणि अखेर तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी पवन वडगावे याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अद्याप अटकेबाहेर असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या तपासाच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
दरम्यान, पीडित कुटुंबीयांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी यापूर्वी पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीच्या अटकेसह प्रकरणात निष्काळजीपणा किंवा सहकार्य केल्याचा आरोप असलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली होती.
पीडित मुलीच्या निधनाची माहिती मिळताच आमदार नितीन देशमुख, वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन लेव्हलकर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके तसेच अन्य अधिकारी पीडितेच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात यावे, अशी मागणी केली. प्रशासनाने आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला.
या घटनेनंतर बाळापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपीला तातडीने अटक व्हावी आणि प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक व वेगवान तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून पुढे येत आहे.

