Two leopards : बाळापूर तालुक्यातील वाडेगावजवळ असलेल्या बटवाडी शेतशिवारात दोन बिबटे दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट नजरेस बिबटे पडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगावजवळ असलेल्या बटवाडी शेतशिवारात दोन बिबटे दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट नजरेस बिबटे पडल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता बटवाडी येथील शेतकरी शेतात जात असताना रस्त्यावर अचानक दोन बिबटे रस्ता ओलांडताना दिसून आले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सध्या रब्बी हंगामातील पिकांची मशागत सुरू असून शेतशिवारात शेतकरी व मजुरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. अशा परिस्थितीत बिबट्यांचा मुक्त संचार दिसत असल्याने जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही तालुक्यातील तामसी, चिंचोली व पिंपळगाव शेतशिवारात बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती आहे.
या बाबत शेतकरी बांधवांनी वेळोवेळी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र वनविभागाकडून शोधमोहीम राबवूनही अद्याप ठोस यश मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बिबट्यांकडून शेतकरी किंवा शेतमजुरांवर हल्ला होऊन दुर्दैवी घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
यासंदर्भात तामसी येथील शेतकरी गणेश काळे यांनी सांगितले की, “यापूर्वीही परिसरात अनेकदा बिबट्या दिसून आला आहे. सध्या शेतातील कामे जोरात सुरू असल्याने धोका वाढला आहे. संबंधित विभागाने तातडीने बिबट्याचा शोध घेऊन योग्य बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.”
दरम्यान, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून वनविभागाने तात्काळ हस्तक्षेप करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

