Training on Digital Fair Price Shops : सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांसाठी २८ जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात स्मार्ट डिजिटल फेअर प्राइस शॉप या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला तालुक्यातील रेशन दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

रेशन दुकाने होणार ‘स्मार्ट’; डिजिटल व्यवसाय व उत्पन्नवाढीच्या संधींवर मार्गदर्शन
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांसाठी २८ जुलै रोजी पंचायत समिती सभागृहात स्मार्ट डिजिटल फेअर प्राइस शॉप या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला तालुक्यातील रेशन दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान रेशन दुकानदारांचे उत्पन्न व मार्जिन वाढविण्याच्या विविध संधी, गावातील बचत गटांशी जोडणी, स्मार्ट डिजिटल फेअर प्राइस शॉपची संकल्पना, नवीन व्यवसायाच्या संधी, पर्यायी उत्पन्नाचे स्रोत तसेच वितरण परवाना नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रेशन दुकाने अधिक सक्षम, आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रशिक्षणाचे आयोजन महाउद्यमी, कौशल्य विकास विभाग तसेच संबंधित शासन महामंडळाच्या समन्वयातून करण्यात आले. महाउद्यमीच्या प्रतिनिधींनी रेशन दुकानदारांना डिजिटल व्यवसाय व्यवस्थापन, ग्राहक सेवा आणि अतिरिक्त उत्पन्नाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी निरीक्षण अधिकारी शुभम फाले यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे रेशन कार्डधारकांसह इतर ग्राहकांनाही दैनंदिन वापरातील दर्जेदार किराणा व घरगुती साहित्य योग्य दरात रेशन दुकानांमधून उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेतील विविध वस्तू एकाच ठिकाणी व वाजवी दरात मिळण्याचा लाभ होणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमास महाउद्यमीच्या स्नेहल झेंडे, तालुका निरीक्षण अधिकारी शुभम फाले, एफएसआय विकी जगताप, लिपिक पवन गांजरे, विशाल लोखंडे, सारिका चिभडे तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष उद्धव नागरे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे रेशन दुकानदारांना डिजिटल युगाशी सुसंगत व्यवसाय पद्धती अवलंबण्यास चालना मिळणार असून शासनाच्या विविध योजनांशी संलग्न होत उत्पन्न वाढविण्याचा मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्वास उपस्थित स्वस्त धान्य दुकानदारांनी व्यक्त केला.

