innocent life: शहरातील संजय नगर परिसरातील एका पडक्या घरात दोन दिवसांचे मृत अर्भक आढळल्याने मंगळवारी सायंकाळी शहरासह परिसरात खळबळ उडाली. जन्मानंतर या निष्पाप अर्भकाला निर्जनस्थळी टाकून दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, या घटनेने माणुसकीला काळिमा फासल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मृत अर्भक पडक्या घरात कोणी टाकले?; देऊळगाव राजा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील संजय नगर परिसरातील एका पडक्या घरात दोन दिवसांचे मृत अर्भक आढळल्याने मंगळवारी सायंकाळी शहरासह परिसरात खळबळ उडाली. जन्मानंतर या निष्पाप अर्भकाला निर्जनस्थळी टाकून दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, या घटनेने माणुसकीला काळिमा फासल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आज सायंकाळी सुमारे ५ वाजता स्थानिक नागरिकांनी पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ वर या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता कुवारे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड, गोपनीय विभागाचे जितेंद्र जाधव, माधव कुटे तसेच गजानन काकड, विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पुरावे सुरक्षित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, अर्भकाच्या मृतदेहाची भटक्या कुत्र्यांनी विटंबना केल्याने प्राथमिक पाहणीत ते स्त्री जातीचे की पुरुष जातीचे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतरच अर्भकाच्या मृत्यूचे नेमके कारण, जन्माची वेळ आणि अन्य महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होणार आहेत.
या निष्पाप जीवाला येथे कोणी आणि केव्हा आणून टाकले, याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संभाव्य रुग्णालयीन नोंदी तसेच प्रसूतीसंबंधी माहिती तपासून या घटनेमागील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची घटनास्थळी कार्यवाही सुरू होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप अर्भकाला अशा अवस्थेत सोडून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

