Police Sports : कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार आता क्रीडांगणावर आपले कौशल्य, शारीरिक क्षमता आणि सांघिक भावना दाखविण्यास सज्ज झाले आहेत. ३७व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चे यजमानपद यंदा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाला मिळाले असून, दि. २३ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत बुलढाणा शहरात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्हा पोलीस दलांसह अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अशा सहा पोलीस घटकांतील सुमारे १ हजार ९४ खेळाडू सहभागी होणार आहेत.

खाकी वर्दीतील खेळाडूंचा क्रीडांगणावर जलवा; ३७व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस स्पर्धांना उद्यापासून प्रारंभ
बुलढाणा : कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार आता क्रीडांगणावर आपले कौशल्य, शारीरिक क्षमता आणि सांघिक भावना दाखविण्यास सज्ज झाले आहेत. ३७व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चे यजमानपद यंदा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाला मिळाले असून, दि. २३ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत बुलढाणा शहरात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्हा पोलीस दलांसह अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अशा सहा पोलीस घटकांतील सुमारे १ हजार ९४ खेळाडू सहभागी होणार आहेत.
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात शारीरिक तंदुरुस्ती, खिलाडूवृत्ती, शिस्त आणि सांघिक भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे बुलढाणा शहरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे.
सहा पोलीस घटकांतील खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेमध्ये यजमान बुलढाणा जिल्हा पोलीस दलासह यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती ग्रामीण आणि अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार सहभागी होणार आहेत. विविध जिल्ह्यांतील पोलीस खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.
१७ क्रीडा प्रकारांत रंगणार स्पर्धांचा थरार
अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण १७ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुरुष व महिला अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, तायक्वांदो, वुशू, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, हॉकी, फुटबॉल, पुरुष व महिला बास्केटबॉल, हँडबॉल, पुरुष व महिला खो-खो, पुरुष व महिला कबड्डी, पुरुष व महिला व्हॉलीबॉल, १० किलोमीटर क्रॉस कंट्री धावणे तसेच जलतरण या खेळांचा समावेश आहे.
विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना आपली ताकद, वेग, चपळता, सहनशक्ती आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. मैदानी खेळांसोबतच सांघिक खेळांमध्येही चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
शहरातील विविध मैदानांवर स्पर्धांचे आयोजन
या क्रीडा स्पर्धा बुलढाणा शहरातील पोलीस कवायत मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, सहकार विद्या मंदिर आणि जिजामाता प्रेक्षागार मैदान येथे पार पडणार आहेत. तर जलतरण स्पर्धांचे आयोजन खामगाव येथील जी.एस. कॉलेजमध्ये करण्यात आले आहे. विविध ठिकाणी स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात नियोजन करण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक खामगाव पियुष जगताप यांच्यासह बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
कर्तव्याच्या धावपळीत व्यस्त असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी मिळणारे हे व्यासपीठ ठरणार आहे. सहा पोलीस घटकांतील खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धांमध्ये चुरस निर्माण होणार असून, बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातही या आयोजनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

