Chatari rural hospital : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत तब्बल ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या ती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात चतारी येथील विकास गजानन कीर्तने यांनी २० जानेवारी रोजी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याची मागणी केली आहे.

४० वर्षांची इमारत मृत्यूचा सापळा ठरण्याची भीती; तातडीच्या दुरुस्ती अथवा नव्या इमारतीची मागणी
राहुल सोनाेने
दिग्रस बू : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत तब्बल ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या ती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात चतारी येथील विकास गजानन कीर्तने यांनी २० जानेवारी रोजी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार सदर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. छतामधून पाणी गळणे, भिंतींना मोठमोठ्या भेगा पडणे, प्लास्टर कोसळणे, छताचे काही भाग कधीही कोसळण्याची शक्यता, मजल्यांवर फुटलेले व खचलेले भाग दिसून येत आहेत. खिडक्या व दारे मोडकळीस आलेली असून नीट बंदही होत नाहीत. परिणामी रुग्णालयातील वातावरण असुरक्षित बनले आहे.
याशिवाय रुग्णालयातील वीज, पाणी व स्वच्छतेच्या सुविधा अपुऱ्या तसेच धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः गरोदर महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचणे व गळतीमुळे इमारतीची दुर्दशा अधिक वाढली असून रुग्ण, डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
चतारी व परिसरातील अनेक गावांतील नागरिक उपचारासाठी या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र जीर्ण इमारतीमुळे योग्य व सुरक्षित उपचार मिळणे कठीण झाले असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सदर इमारतीची तात्काळ तांत्रिक तपासणी करून धोकादायक भाग निश्चित करावेत, आवश्यक असल्यास तात्पुरत्या उपाययोजना राबवाव्यात तसेच नवीन किंवा दुरुस्त इमारतीसाठी निधी मंजूर करून काम तातडीने सुरू करावे, अशी स्पष्ट मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. यासोबतच रुग्णालयातील औषधे, डॉक्टर व वैद्यकीय उपकरणांच्या सुविधांचाही विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना विकास कीर्तने (युवा कार्यकर्ता, चतारी) म्हणाले,
“आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी या रुग्णालयात येतात. मात्र इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नवीन इमारत उभारावी, जेणेकरून ग्रामस्थ व कर्मचारी यांच्या जीवाला धोका राहणार नाही.”

