Mahabreaking

[breaking_news]

  Prataprao Jadhav :दुष्काळाशी मुकाबल्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; पशुधनाच्या चारा-पाण्याचे नियोजन करा! — केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Prataprao Jadhav : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता राहील, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. तसेच लोकसहभागातून धरणांतील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासह नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

  Prataprao Jadhav

  धरणांतील गाळ शेतकऱ्यांना द्या, नद्यांचे खोलीकरण करा; लोकसहभागातून जलसंधारणावर भर

बुलढाणा : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता राहील, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. तसेच लोकसहभागातून धरणांतील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासह नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई, उपलब्ध जलसाठा, शेतीसाठी पाण्याची गरज आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच विविध जलप्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करून शेतीसाठीही नियोजन करा

जिल्ह्यातील धरणे आणि जलप्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा तसेच मृतसाठा विचारात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य आरक्षण करावे. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे नियोजन केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पाण्यातून खरिपातील तूर पिकाला संरक्षित सिंचन देता येईल का, याची शक्यता तपासावी. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनातील संभाव्य घट कमी करण्यास मदत होऊ शकते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.

गावपातळीवर पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना करा

प्रत्येक गावातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गावपातळीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करून त्यांची उपयुक्तता वाढवावी. गावातील उंच ठिकाणी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून सार्वजनिक वापरासाठी पाणी साठविण्याच्या उपाययोजना कराव्यात. जलजीवन मिशनअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरींना तातडीने विद्युत जोडणी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

धरणांतील गाळ काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या

जलसाठ्यांची क्षमता वाढविण्यासोबतच जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी लोकसहभागातून धरणांतील गाळ काढण्याचे नियोजन करावे. जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. या उपक्रमातून जलसाठ्यांच्या संवर्धनाबरोबरच गाळाचा शेतीसाठी उपयोग होऊ शकतो, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

सातपुड्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या खोलीकरणावर भर

जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील अनेक नद्या सातपुडा पर्वतरांगांतून वाहतात. पाण्याच्या प्रवाहासोबत दगड वाहून येत असल्याने नदीपात्रात दगड साचून प्रवाहाची रुंदी कमी झाली आहे. या परिस्थितीचा विचार करून लोकसहभागातून नदीपात्रातील अडथळे दूर करावेत. तसेच नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही जाधव यांनी दिल्या.

पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता महत्त्वाची

दुष्काळाची तीव्रता वाढल्यास पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातील गरज लक्षात घेऊन चारा उपलब्धता, पाणीपुरवठा आणि आवश्यक उपाययोजनांचे नियोजन प्रशासनाने आतापासूनच करावे. दुष्काळी परिस्थितीत नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, शेतीसाठी शक्य तेवढे संरक्षित सिंचन आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविणे, या बाबींवर बैठकीत भर देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top