Heavy rain : पोटच्या गोळ्यासारखे संगोपन करून काढणीला आलेले पिक डोळ्यादेखत सडत असल्याने तालुक्यातील शेतकरी गंभीर संकटात आहे. अतिवृष्टीमुळे पिके जाग्यावर सडत, कुजत असल्याने शेतकऱ्यांचा धीर सुटला आहे. नुकसानग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना भेट देऊन शेतकऱ्यांनी विचारले – “सांगा साहेब, आम्ही जगायचे तरी कसे?” – हा प्रश्न आजही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : पोटच्या गोळ्यासारखे संगोपन करून काढणीला आलेले पिक डोळ्यादेखत सडत असल्याने तालुक्यातील शेतकरी गंभीर संकटात आहे. अतिवृष्टीमुळे पिके जाग्यावर सडत, कुजत असल्याने शेतकऱ्यांचा धीर सुटला आहे. नुकसानग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना भेट देऊन शेतकऱ्यांनी विचारले – “सांगा साहेब, आम्ही जगायचे तरी कसे?” – हा प्रश्न आजही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.
तालुक्यातील पाचही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, पण तुळजापूर मंडळात सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाणी साचल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे जाग्यावर सडले आहे.कपाशी बोंडाच्या अवस्थेत असताना झाडे कुजली आहेत, काही ठिकाणी शंभर टक्के नुकसान झाले आहे. भाजीवर्गीय पिके, मका, फळबागा, शेडनेटमध्ये लावलेले प्लॉट इत्यादींना प्रचंड तोटा झाला आहे.
अतिवृष्टी झाल्यापासून दहा ते बारा दिवस उलटून गेले तरी पंचनाम्यांचा गोंधळ कायम आहे.तहसीलदारांनी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले, तरी कोणतीही ठोस डेडलाईन दिलेली नाही.अधिकारी केवळ “पंचनामे सुरू आहेत” एवढेच सांगून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत.शेतकऱ्यांना बांधावर जाऊन आधार आणि धीर देण्याची साधी तसदीही अधिकारी करत नाहीत.यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या संवेदनशीलतेवर शंका निर्माण झाली आहे.

तुळजापूर मंडळाला सर्वाधिक फटका
तालुक्यात तुळजापूर मंडळाला सर्वाधिक फटका बसला आहे. या मंडळातील पळसखेड, झाल्टा, असोला, जहांगीर, बोराखेडी, बावरा, निमखेड, गिरोली, जांभोरा तसेच देऊळगाव राजा मंडळातील बहुतांश गावे आणि अंढेरा, मेहुना राजा, देऊळगाव मही मंडळातील गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. शंभर टक्के नुकसान झालेले असताना पंचनामे आणि याद्यांचा गोंधळ कायम आहे; शेतकरी मदतीची प्रतीक्षा करत आहेत.
“वडिलोपार्जित जमिनीवर एक एकर कपाशी लागवड केली होती. कर्ज काढून पीक संगोपन केले, पण अतिवृष्टीमुळे बोंड सडली, झाडे कुजली. शासनाने आता तरी नुकसान भरपाई द्यावी.”
संतोष कोल्हे, शेतकरी, तुळजापूर
“सोयाबीन पेरणी केली होती, पण पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने संपूर्ण पीक सडले, शेंगांना कोंब आले. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे, पण अजून बांधावर पंचनामेसाठी कोणी आलेले नाही.”
विष्णू भुतेकर, शेतकरी, पळसखेड

