Kawad Yatra : बाळापूर तालुक्यातील टाकळी खुर्शी येथे महाकालेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने श्रावण सोमवार, २४ ऑगस्ट रोजी कावड यात्रा काढण्यात आली. कावडधारी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांचा निनाद आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण टाकळीनगरी दुमदुमून गेली.

मन नदीचे पवित्र जल घेऊन कावडधारी टाकळीत दाखल; महाकालेश्वराचा जलाभिषेक
अकोला : बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे महाकालेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने श्रावण सोमवार, २४ ऑगस्ट रोजी कावड यात्रा काढण्यात आली. कावडधारी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांचा निनाद आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण टाकळीनगरी दुमदुमून गेली.
महाकालेश्वर शिवभक्त मंडळाच्या कावडधारींनी दिग्रस बु. येथील मन नदीपात्रातून पवित्र जल आणले. हे जल गावातील शिवमंदिरातील भगवान महाकालेश्वराला अर्पण करून विधिवत जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातून कावडची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिलांसह ग्रामस्थांनी सहभागी होऊन कावडधारींचे स्वागत केले व भगवान शंकराचे दर्शन घेतले.
कावड यात्रेदरम्यान विविध समाजघटकांतील नागरिकांनी सहभाग घेतल्याने मिरवणुकीत सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडले. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या यात्रेमुळे टाकळी खुर्शी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पावसासाठी महादेवाला साकडे
बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी आणि नांदखेड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी खरीप पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर कावडधारींनी भगवान शंकराला जल अर्पण करून परिसरात दमदार पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांची पिके वाचावीत, यासाठी साकडे घातले.
कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी पवन राहणे, भूषण घोगरे, अनंता घोगरे, रितेश घोगरे, स्मित राहणे, नागेश घोगरे, भावेश वरणकार, आशिष गोपनारायण, जीवन घोगरे, सोपान घोगरे, हरिओम घोगरे, संकेत घोगरे, चिकू वरखडे, गजानन जगताप, धनराज घोगरे, सोपान बाबुलाल घोगरे, ऋषी घोगरे, रवी दामोदर, निखिल दामोदर, अजय दामोदर, गजानन वरणकार, आयुष घोगरे आदींनी परिश्रम घेतले.

