Storm and rain lash the area : दुसरबीड व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेल्याने एकच तारांबळ उडाली.

अचानक आलेल्या वादळाने दुसरबीड हादरले; वीज खंडित, अंधाराचे साम्राज्य
दुसरबीड : दुसरबीड व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक नागरिकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेल्याने एकच तारांबळ उडाली.
अवघ्या काही क्षणांतच विजांचा कडकडाट सुरू झाला. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, दुसरबीड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळली. या विजेच्या प्रहारामुळे गोठ्याजवळ बांधलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची गाय मृत्युमुखी पडली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांवरील टीनपत्रे तुटून उडून गेली. तसेच रस्त्यालगतचे काही विद्युत खांब कोसळल्याने वीजवाहक तारा तुटल्या आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना रात्रभर अंधार व उकाड्याचा सामना करावा लागला.
वीजपुरवठा खंडित झाल्याने दुसऱ्या दिवशी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतीकामांवरही या परिस्थितीचा परिणाम झाला असून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी नागरिक व शेतकरी करीत आहेत.

