Mahabreaking

[breaking_news]

biometrics, CCTV : शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अद्याप प्रतीक्षा

biometrics, CCTV : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या देऊळगाव राजा येथे तालुकास्तरीय तसेच विभागीय शासकीय कार्यालये असतानाही अनेक कर्मचाऱ्यांची उशिरा उपस्थिती व वेळेआधी गैरहजेरीमुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

biometrics, CCTV

बायोमेट्रिकअभावी कर्मचाऱ्यांची उशीरा ‘एन्ट्री’ ; नागरिकांची कामे खोळंबली

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या देऊळगाव राजा येथे तालुकास्तरीय तसेच विभागीय शासकीय कार्यालये असतानाही अनेक कर्मचाऱ्यांची उशिरा उपस्थिती व वेळेआधी गैरहजेरीमुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज अधोरेखित होत आहे.

देऊळगाव राजा हे पश्चिम विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. मात्र, अनेक अधिकारी–कर्मचारी मुख्यालयात राहत असल्याचा खोटा पुरावा देऊन शासनाची फसवणूक करत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळते. तालुकास्तरीय आणि विभागीय कार्यालयांतील अनेक अधिकारी–कर्मचारी जालना, बुलढाणा, संभाजीनगर व इतर जिल्ह्यांतून दररोज अप-डाऊन करतात.

कार्यालयीन वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असताना अनेक अधिकारी-कर्मचारी ११ नंतरच कार्यालयात दाखल होतात. तर काहीजण सायंकाळी ५ पूर्वीच, तर काही मधल्या सुट्टीनंतरच घरी निघून जातात, अशी नागरिकांची तक्रार आहे. काही कर्मचारी भोजनासाठी अर्धा तास आधी बाहेर जात असल्याने प्रत्यक्ष विश्रांतीचा वेळ एक तासाऐवजी दीड तासापर्यंत वाढतो. अनेकजण भोजनानंतर कार्यालयात परततही नाहीत. यामुळे सेवांचा अभाव जाणवत असून लाभार्थ्यांत नाराजी निर्माण झाली आहे.शासनाकडून कर्मचाऱ्यांवर मोठा खर्च होत असताना त्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

biometrics, CCTV

लाखो रुपये खर्चून बांधलेली निवासस्थाने ओसाड

शहरातील काही शासकीय विभागांसह पंचायत समिती सभापती निवासस्थान तसेच कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानांना काटेरी झुडपे वेढली आहेत. सर्व सुविधा असूनही अधिकारी–कर्मचारी येथे राहत नसल्याने मोठी निवासस्थाने अडगळीत पडली आहेत.
पाणी, शौचालय, विद्युत सुविधा उपलब्ध असूनही कर्मचारी राहात नसल्याने ही घरे धुळखात पडली आहेत.

बायोमेट्रिकची कार्यालयांना ‘अॅलर्जी’?

शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविणे बंधनकारक असतानाही तालुक्यातील अनेक कार्यालयांत ही यंत्रणा कार्यान्वित नाही. काही कार्यालयांत फक्त देखाव्यासाठी मशीन बसविल्याचे दिसून आले.

अनेक कर्मचारी ३० ते १०० किमी अंतरावरून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना होणारा थकवा कामाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सर्वच कार्यालयांत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘वाणवा’ — वरिष्ठ अधिकारी दखल घेतील का?

देऊळगाव राजा येथील तालुका कृषी कार्यालय, उपविभागीय मृदा संधारण कार्यालय, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय, खडकपूर्णा कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय आदी कार्यालयांत अधिकारी–कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

७०% पेक्षा जास्त कर्मचारी ‘अप-डाऊन’वर, सेवा मात्र ठप्प

तालुक्यातील ७० टक्क्यांहून अधिक अधिकारी–कर्मचारी बाहेरून ये-जा करतात. परिणामी अनेक लाभार्थी कामांपासून वंचित राहतात. जिल्हास्तरीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना ही परिस्थिती माहीत असूनही कारवाई होत नाही, याबद्दल नागरिकांमध्ये संताप आहे.

शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या निवासस्थानात कर्मचारी राहत नसतील, तर त्यांना घरभत्ता का द्यावा, असा थेट प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

नागरिकांचा रोष वाढत — बायोमेट्रिक व सीसीटीव्ही तातडीने सुरू करा

कर्मचारी वेळेवर हजर राहावेत आणि कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सर्व कार्यालयांत बायोमेट्रिक उपस्थिती व सीसीटीव्ही प्रणाली तातडीने सुरू करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.


“देऊळगाव राजा येथे विभागीय तसेच तालुकास्तरीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. परंतु कधी अधिकारी नसतात तर कधी कर्मचारी. त्यामुळे कामे रखडतात. प्रत्येक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन असणे अत्यावश्यक आहे.”

  संतोष बंगाळे, शिनगाव जहांगीर  


“शासकीय नियमानुसार अधिकारी व कर्मचारी यांनी निर्धारित वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या कार्यालयांत बायोमेट्रिक व सीसीटीव्ही नाहीत, त्या सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.”

 वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार, देऊळगाव राजा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top