the Trauma Care Center in Mehkar :माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या विशेष प्रयत्नातून मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरसाठी मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेड कंपनीकडून ‘सेव्ह लाइफ’ योजनेअंतर्गत दहा लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य, यंत्रे, उपकरणे व औषधी प्राप्त झाल्या आहेत.

माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांना मिळाले यश, रुग्णांना मिळणार दर्जेदार सुविधा
मेहकर : माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या विशेष प्रयत्नातून मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरसाठी मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेड कंपनीकडून ‘सेव्ह लाइफ’ योजनेअंतर्गत दहा लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य, यंत्रे, उपकरणे व औषधी प्राप्त झाल्या आहेत.
केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून मेहकर येथे अपघातग्रस्त रुग्णांना तातडीचे व सर्वसमावेशक उपचार मिळावेत, या उद्देशाने महायुती सरकारच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाजवळ भव्य ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्ग मेहकर शहराजवळून जात असून, या मार्गावर तसेच राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत व सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठीच या ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य मिळावे यासाठी माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेड कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारी विविध अत्याधुनिक यंत्रे, उपकरणे, वैद्यकीय साहित्य व औषधी असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा साहित्यसाठा कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी (CSR) अंतर्गत ट्रॉमा केअर सेंटरला प्राप्त झाला आहे.
वैद्यकीय साहित्य हस्तांतरणाच्या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता हिवसे, नीरज रायमुलकर, डॉ. धैर्यशील रहाटे, काळे, शंकर वायाळ, लहाने, संदीप पागोरे यांच्यासह मर्सिडीज बेंझ इंडिया लिमिटेड कंपनीचे मुख्याधिकारी पियुष तिवारी, डॉ. पुष्पेंद्र कौशिक व विशाल वायकर हे उपस्थित होते.

