Spare parts : येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मशीन दुरुस्तीच्या कामासाठी बोलावण्यात आलेल्या तंत्रज्ञाने कंपनीतील मशीनचे सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे जुने सुटे भाग चारचाकी वाहनातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी बिहारमधील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

एमआयडीसीतील कंपनीतील घटना; दुरुस्तीसाठी बोलावलेल्या तंत्रज्ञाविरुद्ध गुन्हा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत मशीन दुरुस्तीच्या कामासाठी बोलावण्यात आलेल्या तंत्रज्ञाने कंपनीतील मशीनचे सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे जुने सुटे भाग चारचाकी वाहनातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी बिहारमधील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश विष्णू राऊत (वय २७, रा. निमगाव गुरु, ता. देऊळगाव राजा) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून परशुराम पंडित (रा. भाटिया, जि. बांका, बिहार) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी देऊळगाव राजा येथील सिंगाव फाटा परिसरातील कंपनीत आरोपीला मशीन दुरुस्तीसाठी बोलावण्यात आले होते. आरोपीने मशीन उघडून त्याचे सुटे भाग वेगळे केले. दरम्यान, फिर्यादी मशीनसाठी आवश्यक कच्चा माल आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते.
फिर्यादी गैरहजर असल्याचा फायदा घेत आरोपीने कंपनीतील एक नर्लिंग युनिट, दोन मोल्ड सेट, तीन नर्लिंग टूल विथ बेअरिंग आणि एक नर्लिंग प्लेट असे एकूण ४५ हजार रुपये किमतीचे जुने मशीनचे सुटे भाग चारचाकी वाहनाच्या साहाय्याने चोरून नेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी २१ जुलै २०२६ रोजी रात्री १०.४६ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल बद्रीनारायण डिघोळे यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आरोपीचा शोध घेत असून, चोरीला गेलेल्या मशीनच्या सुट्या भागांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

