Mahabreaking

[breaking_news]

Soybean farmers: सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; उत्पादन निम्म्यावर, दाणाही निकृष्ट!

Soybean farmers: पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडाचा डोणगावसह परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. एकीकडे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, दुसरीकडे दाणा पूर्णपणे न भरल्याने तो बारीक, आकसलेला व वजनाने हलका राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनातील घटेसोबतच शेतमालाच्या गुणवत्तेचेही संकट भेडसावत आहे.

Soybean farmers

  पावसाच्या खंडाचा सोयाबीनला फटका; एकरी उतारा दोन क्विंटलवर

डोणगाव : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडाचा डोणगावसह परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. एकीकडे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, दुसरीकडे दाणा पूर्णपणे न भरल्याने तो बारीक, आकसलेला व वजनाने हलका राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनातील घटेसोबतच शेतमालाच्या गुणवत्तेचेही संकट भेडसावत आहे.

डोणगाव परिसरातील आत्माराम निर्वृत्ती पवार यांच्या शेतात शासनाच्या नियमानुसार पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी तलाठी अमोल राठोड, तलाठी सीमा चव्हाण, कृषी सहाय्यक दिगंबर शिंदे, विमा प्रतिनिधी प्रथमेश नवले, कोतवाल नागेश मानवतकर, ताजबाबू, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे आदींच्या समक्ष हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाच्या प्राथमिक निष्कर्षांवरून यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

जिरायती क्षेत्रात एकरी अवघे दोन क्विंटल, मध्यम जमिनीत सुमारे तीन क्विंटल, तर चांगल्या जमिनीत चार क्विंटलच्या आसपासच सोयाबीनचा उतारा मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या शेंगा व दाण्यांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घट

सर्वसाधारण परिस्थितीत हेक्टरी १४.२८ क्विंटल, म्हणजेच एकरी सुमारे ५.७८ क्विंटल सोयाबीन उत्पादन अपेक्षित मानले जाते. मात्र, यंदा प्रतिकूल हवामानामुळे जिरायती क्षेत्रात उत्पादनात सुमारे ७० टक्क्यांपर्यंत, मध्यम जमिनीत ५० टक्क्यांपर्यंत, तर चांगल्या जमिनीत सुमारे ३१ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर येत आहे.

निकृष्ट दाण्यामुळे बाजारभावाचीही चिंता

पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे सोयाबीनच्या दाण्यांची अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक ठिकाणी दाणे सुरकुतलेले, बारीक व वजनाने हलके राहिले आहेत. त्यामुळे बाजारात अशा सोयाबीनला प्रतवारी, आर्द्रता तसेच तेलाच्या प्रमाणाच्या निकषांवर कमी भाव मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

एकीकडे एकरी उत्पादनात मोठी घट, तर दुसरीकडे दाण्याची प्रत खालावल्यामुळे बाजारभावातही कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोणगाव व परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर उत्पादन घट आणि संभाव्य भावकपात असे दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

बांधावर जाऊन पंचनामे सुरू

दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महसूल कर्मचारी अमोल राठोड, सीमा चव्हाण, पल्लवी गुंठेवार, खिल्लारे, मंडळ अधिकारी अनुप नरोटे, कोतवाल संदीप परमाळे, संतोष मानवतकर, विजय खरात, नागेश मानवतकर तसेच कृषी सहाय्यक दिगंबर शिंदे आदींकडून शेतकऱ्यांच्या समक्ष पीक नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यात येत आहेत.

उत्पादनातील घट, निकृष्ट दर्जाचा शेतमाल आणि संभाव्य बाजारभावातील कपात यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ कितपत मिळतो, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top