Farmers plight : “साहेब, सोयाबीनचे काड डोक्यावर घेतले तर दहा किलोही वजन भरत नाही. सोयाबीनचे दाणे कोठे शोधणार? कपाशीला फुले लागण्यापूर्वीच कळी गळून पडत आहे. कपाशी जळायला लागली आहे. आता दिवा लावायचा म्हटले तर त्यासाठी वात कोठून मिळणार?” अशा शब्दांत साखरखेर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.

हाताशी आलेला घास तोंडात घालण्यापूर्वीच हिरावला; साखरखेर्डा परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत
साखरखेर्डा : “साहेब, सोयाबीनचे काड डोक्यावर घेतले तर दहा किलोही वजन भरत नाही. सोयाबीनचे दाणे कोठे शोधणार? कपाशीला फुले लागण्यापूर्वीच कळी गळून पडत आहे. कपाशी जळायला लागली आहे. आता दिवा लावायचा म्हटले तर त्यासाठी वात कोठून मिळणार?” अशा शब्दांत साखरखेर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
साखरखेर्डा परिसरासह संपूर्ण तालुका आणि जिल्हाच दुष्काळाच्या छायेत सापडला असून, हाताशी आलेला घास तोंडात घालण्यापूर्वीच हिरावला गेल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे आता केवळ पिकांची पाहणी न करता सरसकट दुष्काळाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने पाठ फिरवली
३ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळातील साखरखेर्डा, गुंज, वरोडी, शेवगा जहांगीर, गोरेगाव, तांदुळवाडी आणि शेंदुर्जन या भागांत जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, जून महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवली. त्यामुळे बहरलेले सोयाबीन शेतातच कोमेजून गेले. उभे पीक वाळून गेले असून, दाण्यांचा पत्ता नसतानाही केवळ सोंगणी करावी लागत आहे.
सोयाबीनचे काडही अत्यंत हलके झाले असून, एकरी दोन क्विंटल उत्पादनही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच मशागत, बियाणे, खत आणि औषधांचा खर्च सोडाच; आता सोंगणीचा खर्चही अंगावर येत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
कपाशीच्या कळ्याही गळून पडल्या
सोयाबीनबरोबरच कपाशीची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. कपाशीला पाते लागण्यापूर्वीच कळ्या गळून पडत आहेत. पावसाअभावी कपाशीचे पीक सुकत चालले असून, यावर्षी शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकरी दत्ता गिऱ्हे आणि वामन नाईक यांनी सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, जास्तीत जास्त शेतकरी पंचनाम्याच्या कक्षेत कसे येतील, यासाठी दोन्ही मंडळांतील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच मंगळवारपर्यंत सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.
दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी अधिकारी प्रत्यक्ष शेतात पोहोचल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची भूमिका प्रा. संजय खडसे यांनी घेतल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, लखन राजपूत, आनंद राजपूत, गिऱ्हे, शिवानंद वाकदकर, संजय शिंगणे, कृषी अधिकारी छबुलाल कोल्हे, मुन्ना राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांच्यासह दोन्ही मंडळांतील ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी आणि शिवराम मुदमाळी यांचीही उपस्थिती होती.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

