Shyam Patil Savale: डोंगरखंडाळा येथील प्रभारी सरपंच श्याम पाटील सावळे यांनी गावात राबवलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन पंचायत राज विकास मंचतर्फे त्यांना ‘महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या या भव्य गौरव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे गावाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.

विकासकामांची दखल घेत ‘महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ प्रदान
बुलढाणा : डोंगरखंडाळा येथील प्रभारी सरपंच श्याम पाटील सावळे यांनी गावात राबवलेल्या विविध विकासकामांची दखल घेऊन पंचायत राज विकास मंचतर्फे त्यांना ‘महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या या भव्य गौरव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे गावाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या संलग्न पंचायत राज विकास मंचच्यावतीने आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे, तसेच यशदाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी (IAS) यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विकासकामांच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कल्पक व कार्यक्षम सरपंचांचा सन्मान करण्यात आला. डोंगरखंडाळा गावाचे प्रभारी सरपंच श्याम सावळे पाटील यांनी अल्पावधीत ग्रामविकासासाठी अनेक उपक्रम राबवले. रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ग्रामसौंदर्यीकरण या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला ‘ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ म्हणजे जनतेच्या विश्वासाची पावतीच असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
“हा सन्मान माझा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा आहे. विकासकामे राबविताना ग्रामपंचायतीतील सहकारी सदस्य, ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा पुरस्कार मी डोंगरखंडाळा ग्रामस्थांना समर्पित करतो.”— श्याम पाटील सावळे, प्रभारी सरपंच, डोंगरखंडाळा

